बाणेरमधील कोविड हॉस्पिटल सोमवारपासून सुरू होणार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांच्या उपचारासाठी महापालिकेच्या माध्यमातून मात्र, पूर्णपणे "सोशल कार्पोरेट रिस्पॉन्सिब्लिटी' (सीएसआर) निधीतून स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारले गेले आहे.

पुणे - कोरोना रुग्णांसाठी उभारलेले बाणेरमधील कोविड हॉस्पिटल येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी स्पष्ट केले. या हॉस्पिटलमधील सेवा-सुविधांची व्याप्ती वाढविण्यासह उपचाराच्या आशेने येणाऱ्या रुग्णांना दाखल करून देण्याची सूचनाही महापौर मोहोळ यांनी व्यवस्थापनाला केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांच्या उपचारासाठी महापालिकेच्या माध्यमातून मात्र, पूर्णपणे "सोशल कार्पोरेट रिस्पॉन्सिब्लिटी' (सीएसआर) निधीतून स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारले गेले आहे. त्यात अतिदक्षता (आयसीयू) आणि ऑक्‍सिजनच्या सुमारे सव्वातीनशे बेड आहेत. मात्र, डॉक्‍टरांच्या उपलब्धतेनुसार सध्या 75 रुग्णांवर उपचार सूरू असून, रोज नव्या रुग्णांना दाखल करून घेण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर मोहोळ यांच्यासह महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हॉस्पिटलला भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख आणि कोविड हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. वैशाली यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थितीत होते. "व्हेंटिलेटर', ऑक्‍सिजनचा पुरवठा, त्यातील अडचणी आणि उपायांवरही महापौरांशी चर्चा केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवाजीनगर येथील "सीओईपी'तील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी आणखी 50 बेड वाढविण्यात आल्या. तर एकाच दिवसांत नव्या 30 रुग्णांना दाखल करून घेण्यात आले आहे. दुसरीकडे, उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या आणि घरी सोडलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासोबत गरजेनुसार त्यांच्यावर उपचार करण्याची सुविधा असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Hospital in Baner will start from Monday