
पुणे महापालिकेने वाचविले पुणेकरांचे सात कोटी
पुणे : कोरोनाच्या काळात रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रुपये बिल घेण्याचा प्रयत्न झाला. पण महापालिकेने प्रत्येक रुग्णालयात बिल तपासून त्यातून जागेवरच तब्बल सहा कोटी रुपये कमी केले. तर उपचारानंतर घरी सोडल्यावर अनेकांनी महापालिकेकडे बिलाबाबत तक्रार केली त्यातून १ कोटी १४ हजार रुपयांचे बिल कमी केले आहे. दोन वर्षानंतर कोरोनाची साथ कमी झालेली असताना याच दोन वर्षाच्या कालावधीत महापालिकेने पुणेकरांचे सात कोटी रुपयांची बचत केली.
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला, त्यानंतर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला. शहरात रोज हजारोच्या संख्येने रुग्ण आढळत होते. रुग्णांच्या विलगीकरणासाठी महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू केले तसेच महापालिकेच्या रुग्णालयात उपचारांची सुविधा उपलब्ध केली. शिवाजीनगर व बाणेर येथे जम्बो कोवीड रुग्णालय उभारले. त्यामुळे एकाच वेळी एक हजारपेक्षा जास्त रुग्णांच्या उपचाराची सुविधा निर्माण झाली. त्याच बरोबर खासगी रुग्णालयातही उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी होती.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी सावधगिरी बाळगावी लागत होती. याचे कारण पुढे करून खासगी रुग्णालयांनी अव्वाच्या सव्वा बिल घेण्यास सुरवात केली. त्यामुळे नागरिकांना लाखो रुपयांचे बिल येत होते. याविरोधात तक्रारी आल्यानंतर महापालिकेने रुग्णालयांनी बिल नियमानुसार घेतले आहे की नाही याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक रुग्णालयात बिलाची तपासणी करण्यासाठी आॅडिटरची नियुक्ती केली. उपचारानंतर रुग्णाला घरी सोडण्यापूर्वी बिलाची तपासणी केली जात होती. त्यामध्ये जास्त बिल घेतल्याचे लक्षात घेताच, लगेच तेथे बिल कमी करून दिले जात असल्याने रुग्णाला व त्याच्या नातेवाइकांना आर्थिक दिलासा मिळत होता. सुमारे १ हजार नागरिकांचे अशाप्रकारे ६ कोटी रुपये बचत केली.
उपचारानंतर अनेक रुग्णांनी आमच्याकडून जास्त बिल घेतले गेले, बिलात लावलेल्या वस्तू व उपचार करण्यात आलेलेच नाहीत असा दावा नातेवाईकांकडून केला जात होता. त्यामुळे अशाही तक्रारी महापालिकेने स्वीकारण्यास सुरवात केली. यामध्येही नागरिकांकडून जास्त पैसे घेतल्याचे समोर आले. महापालिकेने तपासणी केलेल्या बिलापैकी १४२ रुग्णांकडून १ कोटी १४ लाख ७४१ रुपये जास्त घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार महापालिकेने संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधून हे पैसे परत करण्यास भाग पाडले आहे.
‘‘कोरोनाच्या रुग्णांकडून उपचारादरम्यान जास्त बिल घेतले जात असल्याने २८ मार्च २०२० पासून प्रत्येक रुग्णालयात आॅडिटरद्वारे बिलांची तपासणी करण्यात आली. रुग्णास डिस्चार्ज देतानाच बिल तपासून सुमारे १ हजार जणांचे ६ कोटी रुपयांचे बिल कमी केले. तर उपचारानंतर घरी गेल्यावर अनेकांनी तक्रारी केल्या होत्या, त्यामध्ये १४२ जणांचे १ कोटी १४ हजार रुपये कमी केले. महापालिकेने यामधून ७ कोटी पेक्षा जास्त रक्कम कमी करून दिली आहे.’’
डिस्चार्जनंतर कमी केलेले बिल
आलेल्या तक्रारी - १४२
रुग्णालयांनी आकारलेले बिल - ५,९५,८६,४७१
तपासणीनंतर झालेले बिल - ४,९५,७१,७३०
कमी केलेली रक्कम - १,००,१४,७४१
Web Title: Covid Hospital Bill Issue Pune Municipal Corporation Saved Seven Crores Of People Of Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..