आदिवासींसाठी कोविड हॉस्पिटल सुरू करावे - दिलीप वळसे पाटील

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी गावांसाठी तळेघर किंवा शासकीय भक्तनिवास (पर्यटन विकास महामंडळ) व घोडेगावात आठ दिवसांत कोविड हॉस्पिटल सुरू करावे, त्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी जागा निश्‍चित करावी, असा आदेश कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

मंचर - आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी गावांसाठी तळेघर किंवा शासकीय भक्तनिवास (पर्यटन विकास महामंडळ) व घोडेगावात आठ दिवसांत कोविड हॉस्पिटल सुरू करावे, त्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी जागा निश्‍चित करावी, असा आदेश कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंचर (ता. आंबेगाव) येथे कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, सभापती संजय गवारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे उपस्थित होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वळसे पाटील म्हणाले, 'घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्यांना सर्व सुविधा विनामूल्यच मिळाल्या पाहिजेत. रॅपिड अँटिजेन टेस्ट घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाऐवजी अन्य ठिकाणी करावी, मंचर उपजिल्हा रुग्णालयात संशयित रुग्ण आल्याबरोबर ताबडतोब रॅपिड अँटिजेन टेस्ट करावी. रुग्णाची माहिती नातेवाईकांना मिळण्यासाठी कक्ष सुरू करावा. मृत्यूचा ऑडिट रिपोर्ट तयार करावा. दशक्रिया विधी व अंत्यविधीला गर्दी वाढत आहे. पोलिसांनी गहाळ राहू नये.'' 

तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, डॉ. सीमा देशमुख, डॉ. चंदाराणी पाटील, डॉ. अंबादास देवमाने यांनी कोविड कामकाजाचा अहवाल सादर केला. 

'रुग्णवाहिकांची संख्या वाढविणार' 
दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मंचर उपजिल्हा रुग्णालयामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. पुण्यातील कोविड जम्बो हॉस्पिटलपेक्षाही येथे वेळेत व दर्जेदार उपचार मिळतात. डॉक्‍टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या आहेत. रुग्णवाहिकांची संख्या वाढविली जाईल, असे डॉ. देशमुख व प्रसाद यांनी सांगितले. 

रुग्णवाहिका बिलाअभावी गॅरेजमध्ये? 
दुरुस्त झालेली घोडेगावची रुग्णवाहिका महिनाभर व मंचर उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका 15 दिवसांपासून गॅरेजमध्ये बिलाअभावी पडून आहे. याबाबत प्रश्न वळसे पाटील यांनी उपस्थित केल्यानंतर आरोग्य खात्याच्या भोंगळ कारभार उघडकीस आला. डॉ. नांदापूरकर म्हणाले, 'गेल्या आठवड्यात पैसे थेट गॅरेज मालकाच्या खात्यात जमा केले आहेत, पण त्याच्या खात्यावर पैसे दिसत नसल्यामुळे तो रुग्णवाहिका सोडत नाही.'

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Hospital should be started for tribals dilip Valse Patil