'लंपी'ला घाबरू नका; गाई-म्हशींचं दूध पिणं सोडू नका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milk

जनावरांमध्ये संसर्ग होत असलेल्या लंपी स्कीन या आजाराचा माणसांमध्ये किंचितही संसर्ग होत नाही. या आजाराचा माणसांना कसलाही धोका नाही.

'लंपी'ला घाबरू नका; गाई-म्हशींचं दूध पिणं सोडू नका!

पुणे - जनावरांमध्ये संसर्ग होत असलेल्या लंपी स्कीन या आजाराचा माणसांमध्ये किंचितही संसर्ग होत नाही. या आजाराचा माणसांना कसलाही धोका नाही. त्यातच जनावरांमधील हा संसर्गजन्य आजार केवळ नर जनावरांमध्ये (बैल) मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एकाही दुभत्या गाईला किंवा म्हशीला या आजाराचा संसर्ग झालेला नाही. या आजाराच्या संसर्गाचा गाई-म्हशी आणि माणसांना कसलाही धोका नसल्याचा निष्कर्ष पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी काढला आहे. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी गाई-म्हशींचे दूध बिनधास्त खावे, असे आवाहन जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी केले आहे.

या आजाराला आळा घालण्यासाठी औषधोपचारांपेक्षा शेतकऱ्यांनी आपापल्या गुरांची पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी गुरांच्या गोठ्यांची नियमित स्वच्छता करणे, गुरांची स्वच्छता करणे, गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करणे, यासाठी डास व डासांच्या अळ्या मारण्यासाठी आवश्‍यक औषध फवारणी करणे आदी खबरदारीच्या उपाययोजना केल्यास, या आजाराला प्रतिबंध घालणे सोपे आहे. या खबरदारीच्या उपाययोजनांच्या जोडीलाच शेतकऱ्यांनी आपापल्या गुरांना गोठ्याच्या बाहेर सोडू नये, गावातील किंवा शेजारच्या गावातील गुरांसोबत गुरांना जाऊ देऊ नये, असा सल्लाही डॉ. विधाटे यांनी दिला आहे.

गावा-गावातील शेतकऱ्यांची एकमेकांची गुरे एकत्रित येऊ नयेत, यासाठी जिल्ह्यातील गुरांचे आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. गावोगाव होणाऱ्या यात्रा-जत्रांमध्ये बैलगाड्या किंवा अन्य माध्यमातून गुरे एकत्रित येऊ नयेत, यासाठी यात्रा-जत्रांत गुरांना आणण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. या सर्वांच्या जोडीलाच बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे.

तत्काळ उपचार करा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लंपी स्कीन या गुरांच्या आजारांबाबत अधिक जागृत राहावे. यासाठी कोणत्याही गुराला ताप आल्याचे निदर्शनास येताच, जवळच्या पशुवैद्यकीय केंदांशी तातडीने संपर्क करावा. जेणेकरून संबंधित पशुवैद्यकीय केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी हे आपल्या घरी येऊन तत्काळ गुरांवर उपचार करतील, अशी सुविधा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन

या आजाराला त्वरित आळा घालता यावा, या उद्देशाने राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने राज्यस्तरावर शेतकरी मदत कक्ष कार्यान्वित केला आहे. या कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी १९६२ हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकरी या हेल्पलाईनवर फोन करून लंपी स्कीन आजाराच्या प्रतिबंधासाठी तत्काळ मदत मागू शकतात, अशी सोय करण्यात आली आहे.

Web Title: Cow Buffalo Milk Eat Pune Expert

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..