पुणे - राज्यमाता गोमाता संवाद यात्रेला प्रारंभ

पुणे -  राज्यमाता गोमाता संवाद यात्रेला प्रारंभ
Published on

कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते
--
खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून खंत व्यक्त
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : ‘‘गोवंश हत्या बंदीचा कायदा अस्तित्वात असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी झगडावे लागते,’’ अशी खंत राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. गोवंश संवर्धन हे शेतकरी व गोपालकांवर बोजा ठरू नये, तर गोमयाधारित उत्पादनांच्या प्रभावी विपणन व्यवस्थेतून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

देशी गोवंशाचे रक्षण, संवर्धन आणि गोशाळांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ सोमवारी (ता. २२) राज्यभर सुरू झाली. पुण्यात झालेल्या उद्‍घाटन कार्यक्रमात गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री वल्लभ कठारिया, भाजपचे माजी उपाध्यक्ष शाम जाजू आणि आयोगाचे सचिव शामकांत पाटील उपस्थित होते.

यावेळी प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘गोवंश संवर्धन हे शेतकरी आणि गोपालकांसाठी आर्थिक ओझे ठरता कामा नये. गोवऱ्यांचे ज्वलन पर्यावरणासाठी हानीकारक आहे. त्यामुळे गोबर गॅस निर्मिती आणि पर्यायी इंधनासाठी आवश्यक तंत्रज्ञान व सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.’’

कठारिया म्हणाले, ‘‘या संवाद यात्रेमुळे गोवंश संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती होईल आणि गोशाळांच्या बळकटीकरणाला चालना मिळेल.’’

मुंदडा यांनी सांगितले की, ही यात्रा सलग १५ दिवस सुरू राहणार असून सुमारे ६ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून एक हजाराहून अधिक गोशाळांचा प्रत्यक्ष सहभाग असेल. या कालावधीत १५ हजारांहून अधिक गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे. यात्रेचा समारोप ५ जुलै रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com