भोरमधील ४७ शेतक-यांवर गुन्हा दाखल, कारण...  

विजय जाधव
Sunday, 13 September 2020

शहरातील पिराचा मळा येथील भोरेश्वर औद्योगीक वसाहतीमधील जागेच्या हद्दनिच्छिची कामात अडथळा आणल्याप्रकरणी ४७ शेतक-यांवर भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणास आता वेगळे वळण मिळाले आहे.

भोर (पुणे) : शहरातील पिराचा मळा येथील भोरेश्वर औद्योगीक वसाहतीमधील जागेच्या हद्दनिच्छिची कामात अडथळा आणल्याप्रकरणी ४७ शेतक-यांवर भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणास आता वेगळे वळण मिळाले आहे.

गुरुवारी (ता.१०) भोरेश्वर औद्योगीक वसाहतीच्या ३५ एकर क्षेत्राच्या झालेल्या मोजणीच्या हद्दी निच्छित करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या चार जणांचे पथक आले होते.  त्यांच्यासमवेत नगरपालिकेचे अधिकारी आणि २० पोलिसही होते. जमिनीचा मोबदला न मिळाल्याने काही शेतक-यांनी हद्दनिच्छितीस विरोध केला.

दरम्यान, त्यानंतर भूमीअभिलेख निरीक्षक किशोरकुमार कोरे यांनी नगरपालिका व संबंधीत शेतकरी यांना कागदपत्रांसह आपले म्हणणे मांडण्यास आठ दिवसांची मुदत दिली. त्यावर सूनावणी घेवून पुढील निर्णय घेण्यात येईल. असे सांगितल्यानंतर शेतक-यांनी विरोध थांबविला. मात्र नगरपालिका व भूमापन कर्मचा-यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. 

त्यानंतर शनिवारी (ता. १२) सायंकाळी नगरपालिकेचे स्थापत्य अभियंता अभिजीत अरुण सोनावले (वय २९) यांनी भोर पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल फिर्याद दाखल केली. कोरोना आजाराच्या नियमांचे पालन न करणे, बेकायदेशीर गर्दी जमा करणे, नगरपालिकेच्या कर्मचा-यांच्या अंगावर धावून जाणे, अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करू अशा प्रकारच्या तक्रारी संबंधीत शेतक-यांच्याविषयी फिर्यादीत मांडण्यात आल्या आहेत. पोलिसांनी ४७ शेतक-यांवर सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राजू मोरे पुढील तपास करीत आहेत.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime filed against 47 farmers in Bhor