
स्पेशल 26' चित्रपटाच्या कथेप्रमाणे "एसीबी'चे अधिकारी असल्याचे भासवून थेट नगररचना उपसंचालकालाच लुटण्याचा प्रयत्न
पुणे : शुक्रवारी सकाळी ठिक सात वाजताची वेळ. वारजे परिसरात राहणाऱ्या "पीएमआरडीए'च्या नगररचना उपसंचालकाच्या घरी तिघेजण येतात. आम्ही "मुंबई एसीबी'चे अधिकारी असल्याचे सांगून घराची झडती घ्यायला सुरुवात करतात. अधिकाऱ्यासव सर्वांचे मोबाईलही ताब्यात घेऊन कादगपत्रे तपासतात. अचानक तुमच्या कार्यालयात एका व्यक्तीने कामासाठी पैसे घेतले, तो आमच्या ताब्यात आहे. तुमच्यावर कारवाई करु, असे सांगत त्यांनी थेट पाच लाखांची खंडणी मागितली. दरम्यान, घराबाहेर गेलल्या मुलाला अधिकाऱ्याच्या मुलाला संशय आला. त्याने तत्काळ पोलिसांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कथित "एसीबी' अधिकाऱ्याने महिला पोलिस अधिकाऱ्यास त्यांच्या वरिष्ठांशी बोलत असल्याचे सांगून तेथून पाया काढत पसार झाले. अभिनेता अक्षय कुमार याच्या "स्पेशल 26' या चित्रपटातील कथेप्रमाणे वारजे येथे घडलेला हा प्रसंग केवळ अधिकाऱ्याचा मुलगा व पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला.
याप्रकरणी पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नगररचना विभागाचे उपसंचालक दत्तात्रय पवार यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन याप्रकरणी सावंत असे नाव सांगणाऱ्या तोतया पोलिसासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे वारजे जकात नाका परिसरात राहतात. शुक्रवारी सकाळी (ता.24) सात वाजता त्यांच्या घरी तिघेजण आले. त्यांनी आपण मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालयातून आलो असल्याचे सांगत फिर्यादीच्या घरी कारवाई करण्यास सुरुवात केली. फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबीयांचे फोन काढून घेतले. "दोन दिवसांपूर्वी तुमच्या कार्यालयात एक महिला आली होती. तिने एक दाखला मागितला होता. तेव्हा, तुमच्या कार्यालयातील एकाने महिलेकडे पैसे मागितले. या प्रकरणात तुमचे नाव पुढे आले आहे, म्हणूनच तुमच्या घराची तातडीने झडती घ्यायची आहे, असे तोतया पोलिसांनी उपसंचालकांना सांगितले. "तुमच्यावर होणारी कारवाई टाळायची असेल, तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगत अखेर त्यांनी पैशांची मागणी केली. त्यामुळे उपसंचालकांना संशय आला. दरम्यान, फिर्यादीचा मुलगा बाहेर गेला होता. तो घराजवळ आला, त्यावेळी त्यालाही संशय आला. त्याने सकाळी गस्त घालणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक तृप्ती पाटील यांना याबाबत सांगितले. त्यानंतर पाटील फिर्यादीच्या घरी आल्या. तेव्हा, त्याने त्यांना "तुम्ही इथे कशा आलात' अशी विचारणा करून त्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा मोबाईल क्रमांक त्यांच्याकडून घेतला. त्यानंतर त्यांना फोनवर बोलत असल्याचे दाखवून तो घराबाहेर गेला.
बराच वेळ होऊनही संबंधित व्यक्ती फिर्यादीच्या घरात परत आली नाही. त्यामुळे पोलिस अधिकारी व फिर्यादी त्यांना बघण्यासाठी बाहेर गेले. तेव्हा, बाहेर कोणीच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, त्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण पाहीले. तेव्हा तिघेजण तेथून पळून जात असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
""कर्वेनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. ऐरवी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमध्ये स्थानिक पोलिसांकडून हस्तक्षेप केला जात नाही. मात्र हि कारवाई संशयास्पद वाटल्याने पोलिसांचे पथक तेथे पाठविले होते. संशयित पसार झाले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.''
- शंकर खटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलिस ठाणे.
Web Title: Crime In India Pretend To Be Anti Corruption Bureau Officer Fraud With Pmrda Officer Crime Against Three Special 26 Movie
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..