पत्नीसह तीच्या आईवर जावयाचा न्यायालयाच्या आवारात गोळीबार; पत्नी जागीच ठार

सासरी नांदत नाही, कौटुंबिक वाद न्यायालयात नेला व पोटगीसाठी दावा दाखल केल्याच्या रागातून माजी सैनिकाने आज भरदिवसा पत्नीसह तीच्या आईवर पिस्तुलातून गोळीबार केला.
Deepak Dhawale and Manjula Dhawale
Deepak Dhawale and Manjula DhawaleSakal
Summary

सासरी नांदत नाही, कौटुंबिक वाद न्यायालयात नेला व पोटगीसाठी दावा दाखल केल्याच्या रागातून माजी सैनिकाने आज भरदिवसा पत्नीसह तीच्या आईवर पिस्तुलातून गोळीबार केला.

शिरूर - सासरी नांदत नाही, कौटुंबिक वाद न्यायालयात नेला व पोटगीसाठी दावा दाखल केल्याच्या रागातून माजी सैनिकाने आज भरदिवसा पत्नीसह तीच्या आईवर पिस्तुलातून गोळीबार केला. यात तीन गोळ्या लागल्याने पत्नी जागीच ठार झाली; तर तीची आई गंभीर जखमी झाली. शिरूर न्यायालयाच्या आवारात दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेनंतर खळबळ उडाली. घटनेनंतर हल्लेखोरावर जमावाने दगडफेक केली, मात्र पिस्तुलाचा धाक दाखवित तो पळून गेला. मात्र, काही वेळातच पोलिसांनी नाकेबंदी करून त्याला त्याच्या भावासह पकडले.

मंजुळा दीपक ढवळे (वय ३२, सध्या रा. शिरूर) यांचा गोळीबारात मृत्यु झाला; तर त्यांची आई तुळसाबाई रंगनाथ झांबरे (वय ६०, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) या या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दीपक पांडुरंग ढवळे (वय ४२, सध्या रा. खुंटवली, अंबरनाथ, ठाणे, मूळ रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर) या हल्लेखोरासह त्याचा भाऊ संदीप पांडुरंग ढवळे या दोघांना पोलिसांनी घटनेनंतर अर्ध्या तासातच पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून परवानाप्राप्त पिस्तूल, दोन मॅगझिन, सूरा अशी हत्यारे आणि ते प्रवास करीत असलेली रिक्षा (क्र. एमएच ०५ बीजी ४६५०) पोलिसांनी ताब्यात घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार : मृत मंजूळा यांनी कौटुंबिक कलहातून पती दीपक ढवळे यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. विभक्त राहात असल्याने त्यांनी शिरूर न्यायालयात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे रक्षण करणारा अधिनियम २००५ मधील तरतूदीनूसार पोटगीसाठीही दावा दाखल केला होता. आज सुनावणी होऊन अंतरिम निकाल जाहीर होणार असल्याने मंजुळा या आई तुळसाबाई; तसेच आपल्या दोन मुलींसह सकाळीच शिरूर न्यायालयात आल्या होत्या. दरम्यान, दुपारी बाराच्या सुमारास दीपक ढवळे हा भाऊ संदीप याच्यासह रिक्षातून आला. तुमच्याशी बोलायचे आहे, असे म्हणत त्याने पत्नी, मुली व सासूला न्यायालयाच्या जवळच असलेल्या पाटबंधारे खात्याच्या आवारात नेले. तेथील झाडाखाली त्यांची बराच वेळ चर्चा चालू होती. पुढे चर्चेचे रूपांतर बाचाबाचीत झाले आणि संतापाच्या भरात दीपक याने कंबरेला खोवलेले पिस्तुल काढून त्यातून पत्नीवर अंदाधूंद गोळीबार केला. त्यांच्या खांद्यावर, पोटावर, पाठीवर व पायावर गोळ्या लागल्या. मुलीला वाचवायला आलेल्या तुळसाबाई यांच्यावरही त्याने गोळीबार केला. मात्र त्यांना गोळी लागली नाही. त्यावेळी पिस्तुलाच्या उलट्या बाजूने त्याने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या कानाजवळूनही एक गोळी घासून गेली.

गोळीबाराचा आवाज झाल्याने न्यायालयाच्या आवारातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात दोन महिला पडल्याचे दिसल्याने जमावाने दीपकला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने जमावावर पिस्तुल रोखले. त्यावेळी जमावातील काहींनी त्याच्यावर दगडफेक केली. हा गोंधळ ऐकून न्यायालयात बंदोबस्तासाठी असलेल्या दोघा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र हल्लेखोर दीपक याने त्यांच्यावरही पिस्तूल रोखले. यावेळी त्याने हवेत गोळीबार केला व भावासह रिक्षातून पळून गेला.

या घटनेची माहिती मिळताच शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव व अभिजीत पवार यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर रिक्षातून पळाल्याची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना कळवून परिसरासह पुणे - नगर रस्त्यावर नाकेबंदी केली. दरम्यान, या गंभीर घटनेची दखल घेत एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, सहायक फौजदार अनिल चव्हाण, ब्रह्मानंद पोवार, नाना काळे, संतोष औटी, भाग्यश्री जाधव या पोलिस पथकाने पोलिस वाहनातून रिक्षाचा पाठलाग केला व फलके मळ्याजवळ दोन वाहनातून रिक्षाला घेरले. त्यावेळी हल्लेखोर दीपक ढवळे व त्याचा भाऊ संदीप हे पोलिसांना शरण आले. त्यांनी पिस्तूल खाली ठेवताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com