
टिडीआरच्या नावाने फसवणुक करुन चार वर्ष फरारी आरोपीस पोलिसांच्या बेड्या
पुणे : हस्तंतरणीय विकास हक्क (टिडीआर) देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संबंधित आरोपी मागील चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. विजय आबासाहेब घोरपडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार 17 जानेवारी 2015 ते 25 एप्रिल 2017 या काळात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. तर घोरपडे हा बांधकाम व रिअल इस्टेटमध्ये काम करतो.
फिर्यादीची व्यवसायाच्या निमित्ताने घोरपडे याच्याशी ओळख झाली होती. दरम्यान, फिर्यादी यांना धायरी येथे दोन ठिकाणी आपली जमीन असून त्या जमीनीवर महापालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षण आले आहे.त्याच्या मोबदल्यापोटी आपल्याला महापालिकेकडून टिडीआरचे हक्क मिळणार आहे. भविष्यात मिळणारा हा टिडीआर आपल्याला विकायचा आहे, असे फिर्यादीस सांगून त्यांना काही कागदत्रेही दाखविली.संबंधित जमीनीवर कोणत्याही प्रकारचा बोजा नसल्याचे पटवून दिले. त्यामुळे फिर्यादींनी त्याच्यावर विश्वास ठेवून संबंधित टिडीआर विकत घेण्याचे ठरविले.या टिडीआरची रक्कम दोन कोटी रुपये झाल्याचे सांगून त्याने त्यातील एक कोटी रुपये करारनाम्यावेळी आणि उर्वरित एक कोटी रुपये विकसन हक्क हस्तांतरण पत्र (डीआरसी) दिल्यानंतर देण्याचे ठरविले.
त्याप्रमाणे फिर्यादी यांनी त्यास करारनाम्यावेळी एक कोटी रुपये दिले.त्यानुसार 17 जानेवारी 2015 रोजी त्याच्यासमवेत समझोता करारनामा करुन घेतला. दरमयान, फिर्यादींनी माहिती घेतली.तेव्हा, संबंधित जमीन ही घोरपडे व त्याच्या कुटुंबीयांनी विद्यानंद बॅंकेच्या सोलापुर शाखेकडे गहाण ठेवल्याची आणि गहाणखतावरुन त्यांनी बॅंकेकडून तीन कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती पुढे आली.आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन संबंधित प्रकरणामध्ये त्याच्या पत्नी व मुलाला अटकपुर्व जामीन मंजुर झाला. त्यानंतर घोरपडे कुटुंब पसार झाले होते.त्याचा शोध पोलिस घेत होते, मात्र ते पोलिसांना गुंगारा देत होते. दरम्यान, घोरपडे हा त्याच्या नातेवाईकाच्या घरी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यास अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहायक पोलिस निरीक्षक राकेश जाधव यांच्या पथकाने हि कारवाई केली.
Web Title: Crime News Khadak Police Action Accused Arrestes In Fraud Of Tdr Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..