येरवड्यात शनिवारी पहाटे दोन सराईत गुन्हेगारांचा टोळक्‍याकडून खुन, सलग घडलेल्या खुनाच्या घटनांनी शहर हादरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news murder case registered against 12 people Yerawada police station pune

येरवड्यात शनिवारी पहाटे दोन सराईत गुन्हेगारांचा टोळक्‍याकडून खुन, सलग घडलेल्या खुनाच्या घटनांनी शहर हादरले

पुणे : पुर्वीच्या भांडणाच्या रागातुन टोळक्‍याने पुर्वनियोजित कट करून दोन सराईत गुन्हेगारांवर धारदार शस्त्रांनी वार करुन त्यांचा खुन केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. हि घटना येरवड्यातील पांडू लमाण वस्ती येथे घडली. दरम्यान, या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहेत. तर घटनेनंतर काही वेळातच दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुहेरी खुनासह शहरात सलग घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर (वय 35), सुभाष ऊर्फ पापा किसन राठोड (वय 40, दोघेही रा. लमाण तांडा, येरवडा) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुभाष राठोड याचा भाऊ लक्ष्मण राठोड याने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लक्ष्मण हा देखील या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन शंकर मानू चव्हाण (वय 55), बादल शंकर चव्हाण (वय 25), विकास शंकर चव्हाण (वय 28), अनिल महेश देवरा (वय 50), रोहित उर्फ निखिल परशुराम संके (वय 20), निशांत तायप्पा चलवादी (वय 20), कृष्णा उर्फ काल्या (वय 20, सर्व रा. पांडू लमाण वस्ती, येरवडा) यांच्यासह अन्य चार अनोळखी व्यक्ती अशा एकूण 12 जणांविरुद्ध खुन, खूनाचा प्रयत्न अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी शंकर चव्हाण व बादल चव्हाण या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष राठोड व शंकर चव्हाण काही वर्षांपासून वाद होते. शंकर चव्हाण याच्यावर 13 वर्षांपूर्वी सुभाष राठोड याने गोळीबार केला होता. त्या गुन्ह्यात तो बचावला होता, तर या गुन्ह्यात शिक्षा राठोड यास शिक्षा झाली होती. शिक्षा पुर्ण झाल्यानंतर राठोड काही वर्षांपुर्वी कारागृहाबाहेर आला होता. दरम्यान, शनिवारी पहाटे तीन वाजता फिर्यादी लक्ष्मण राठोड हे त्याच्या दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यावेळी तारकेश्वर मंदीराच्या पायथ्याजवळ त्यांना त्यांचा लहान भाऊ सुभाष व त्याचा मित्र अनिल वाल्हेकर हे दोघे पायी घराकडे जाताना दिसले.

फिर्यादीने दोघांना त्याच्या दुचाकीवर बसवून तिघेजण घराकडे निघाले होते. त्यांची दुचाकी माजी नगरसेविका श्वेता चव्हाण यांच्या कार्यालयासमोर आली. त्यावेळी पाच ते सहा जणांच्या टोळक्‍याने त्यांना अडविले.त्यानंतर रोहित संके व निशांत चलवादी यांनी सुभाष याच्या डोक्‍यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तिघेजण दुचाकीवरुन खाली कोसळले. त्यानंतर इतर आरोपींनी तिघांवर धारदार शस्त्राने वार केले. दरम्यान, बादल चव्हाण, विकास चव्हाण, अनिल देवरा हे त्यांचे कार्यालयासमोर उभे राहून "मारा त्यांना जिवंत सोडू नका' असे ओरडत होते. त्यावेळी शंकर चव्हाण हा देखील मोठ्याने ओरडून तिघांना मारून टाकण्यास सांगत होता. टोळक्‍याने सुभाष व अनिल या दोघांवर मोठ्या प्रमाणात वार केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यु झाला.

फिर्यादीच्याही डोक्‍यात वार करण्यात आले. मात्र फिर्यादीने तेथून पळ काढल्याने त्यांचा जीव बचावला. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतरही परिसरात बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी घटनास्थळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, अतिरीक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोघांचेही मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.

खुन झालेले सराईत गुन्हेगार

खुन झालेले अनिल वाल्हेकर व सुभाष राठोड हे दोघेही सराईत गुन्हेगार होते. त्यांच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, हाणामारी असे गुन्हे दाखल होते. पोलिसांनी त्यांच्यावर तडीपार व प्रतिबंधात्मक कारवाईही केली होती. सुभाष राठोड याने शंकर चव्हाण याच्यावर गोळीबार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याच गुन्ह्यात 2008 मध्ये त्यास शिक्षा झाली होती. यानंतर 2014 मध्ये शिक्षा पुर्ण झाल्यानंतर तो कारागृहाबाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा येरवडा परिसरात दहशत निर्माण करण्यास सुरवात केली होती.

"वाल्हेकर व राठोड हे दोघेही पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार होते. पुर्ववैमनस्यातुन त्यांचा खुन झाला असून त्यांच्या खुनप्रकरणी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे.''

- रोहीदास पवार, पोलिस उपायुक्त, परिमंडळ चार