esakal | धक्कादायक! पुण्यात पोलिस हवालदाराचा खून; धारदार शस्त्राने वार

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! पुण्यात पोलिस हवालदाराचा खून
धक्कादायक! पुण्यात पोलिस हवालदाराचा खून
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : फरासखाना पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारचा तडीपार गुंडाने चाकूने गळा चिरून खून केला. ही घटना मंगळवारी (ता. ४) रात्री सव्वा बाराच्या सुमारास बुधवार पेठेतील श्रीकृष्ण थिएटरजवळ घडली. खून करणा-यास पोलिसांनी अटक केली आहे.

समीर जमील सय्यद (वय ४८, रा. खडक पोलिस लाईन, शुक्रवार पेठ) असे खून झालेल्या हवालदाराचे नाव आहे. सराईत गुन्हेगार प्रवीण श्रीनिवास महाजन (रा.कसबा पेठ) याला खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तो कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्याची रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे. महाजन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तीन ते चार गुन्हे दाखल आहेत. त्याला एक वर्षापूर्वी शहर व जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. तो तडीपारीचा भंग करून शहरात आला होता. त्याच्यावर यापूर्वीही तडीपारीचा भंग केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा: कर्ज मिळवून देतो म्हणून व्यावसायिकाची 32 लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद हे फरासखाना पोलिस ठाण्यात ड्यूटी ऑफिसर म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांची ड्यूटी संपल्यावर ते घरी गेले. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास ते श्रीकृष्ण थिएटर येथील अहीर हॉटेल येथे थांबले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. खुनाची माहिती मिळताच अपर पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलिस निरीक्षक राजेश तटकरे, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, अजितकुमार पाटील व तेजस्वी पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे करत आहेत.

बाचाबाची व त्यानंतर रागाच्या भरात केला खून :

सय्यद थांबलेल्या ठिकाणी महाजन आला. त्याची सय्यद यांच्याबरोबर बाचाबाची झाली. त्यानंतर रागाच्या भरात महाजनने सय्यद यांच्या गळ्यावर, पोटावर व छातीवर वार केले. सय्यद हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर रहिवाशांनी याबाबत पोलिस नियंत्रण कक्षास माहिती दिली. नागरिकांनी सय्यद यांना केईएम रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले..

देहविक्री करणाऱ्या महिलेचा खून :

सय्यद यांचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर वेश्यावस्तीत एका देहविक्री करणाऱ्या महिलेचा देखील चाकूने भोसकून खून करण्यात आला. राणी मुनाफ शेख (वय ३६, सध्या रा. बुधवार पेठ, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणीफरासखाना पोलिसांनी बखर नावाच्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बखर भोसरीतील एका हॉटेलमध्ये वेटर आहे. राणी आणि त्याची ओळख होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. या वादातून त्याने बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास राणीवर चाकूने वार करून खून केला.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा