esakal | 16 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 32 लाखांची फसवणूक

बोलून बातमी शोधा

Fraud
कर्ज मिळवून देतो म्हणून व्यावसायिकाची 32 लाखांची फसवणूक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कंपनीच्या बांधकामासाठी व नवीन मशीन खरेदी करण्यासाठी खासगी वित्त पुरवठा (Private Finance) करणाऱ्या संस्थेकडून 16 कोटी रुपयांचे कर्ज (Loan) मिळवून देण्याचा बहाणा करून दोघांनी एका व्यावसायिकाची तब्बल 32 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक (Cheating) केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Fraud of Rs 32 lakh to a businessman as he gets a loan)

श्रीजी, एसव्ही फायनान्स अँड इन्वेसमेंट या कंपनीचा प्रमुख हेमंत जोशी (वय 45, रा.घाटकोपर, मुंबई), संजय जगन्नाथ अहीरे (रा. ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निलेश सुभाष उपासनी (वय 48, रा.टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 17 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत घडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उपासनी यांची डी एमएसएस इन्फ्रा इंडीया नावाची भागीदारीतील कंपनी आहे. त्यांच्या कंपनीच्या रासायनिक प्रक्रियेसाठीच्या बांधकामाचे काम सुरू आहे.

हेही वाचा: नागरिकांच्या सतर्कतेमुळे 3 हरणांना जीवदान

त्यासाठी त्यांना कर्जाची गरज होती. उपासनी यांना ओळखीच्या व्यक्तीमार्फत आरोपीची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कर्ज मिळवण्यासाठी जोशी व अहीरे या दोघांशी संपर्क साधला. त्या दोघांनी उपासनी यांचा विश्वास संपादन करीत त्यांना कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. फिर्यादीस 16 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांनी व्यवहाराच्या प्रक्रियेसाठी फिर्यादीकडून वेळोवेळी 32 लाख 38 हजार रुपये घेतले. त्यानंतर उपासनी ठाण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये करार नोंदणीसाठी गेले, त्यावेळी त्यांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. मात्र त्यांचे फोन बंद होते, त्यानंतर फिर्यादी त्यांच्या कार्यालयाकडे गेले, तेव्हा त्यांनी कार्यालय बंद करून तेथून पळ काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच त्यांनी सांगितलेली वित्त पुरवठा कंपनी देखील बोगस असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली. विश्रांतवाडी पोलिसांनी तक्रारीची चौकशी केल्यानंतर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा