
बारामतीतील रियल डेअरीच्या फसवणूक प्रकरणी चौघांवर गुन्हा
बारामती : दूधाची क्वालिटी चांगली असल्याचे बनावट रेकॉर्ड तयार करत ते खरे असल्याचे भासवत येथील एमआयडीसीतील रियल डेअरी इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीची 87 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे प्रमुख मनोज कुंडलिक तुपे (रा. विद्या प्रतिष्ठान शाळेजवळ, ग्रीन पार्क, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार राहूल संभाजी शेडगे, अभिजित बाळू कदम, हनुमंत म्हस्कू जांबळे व दिपक शिंदे (पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
1 मार्च ते 13 जून 2022 या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार कंपनीमध्ये काम करणा-या शेडगे, कदम यांनी जांबले व त्यांच्या टॅंकरवरील चालक दीपक शिंदे यांच्याशी संगनमत करत कमी क्वालिटीचे दूध असताना त्याची क्वालिटी चांगली असल्याचे बनावट रेकॉर्ड तयार करत कंपनीची सुमारे 86 लाख 93 हजारांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुधाची प्रतवारी बदलल्याने संशय आल्यानंतर या प्रकरणाचा तपास केल्यावर ही बाब पुढे आल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
Web Title: Crime News Real Dairy Fraud Case Crime Against Four Accused Baramati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..