शिरूर मधे गोळीबार, दोघे जखमी; तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Shooting in Shirur two injured Three arrested

शिरूर मधे गोळीबार, दोघे जखमी; तिघांना अटक

शिरूर : पूर्वीच्या गुन्ह्यात मिटवामिटवी केल्याचा राग मनात धरून रिव्हॉल्वर मधून गोळीबार करणाऱ्या तिघांना शिरूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित अटक केली. गुरूवारी (ता. ५) मध्यरात्री गोळीबाराचा हा प्रकार घडला होता. यात दोघे जखमी झाले आहेत.अंकुश सुदाम बांदल (वय ३९), धनंजय अशोक पाचर्णे (वय ३२) व आकाश तानाजी रोडे (वय २९, तिघे रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांना पोलिसांनी घटना घडल्यानंतर केवळ आठ तासात अटक केली असून, शिरूर न्यायालयाने त्यांना सोमवार (ता. १०) पर्यंत पोलिस कोठडी दिली. या गोळीबारात कैलास फक्कड पाचर्णे (वय ४८, रा. करडे) हे जखमी झाले असून, त्यांना वाचवण्यासाठी मधे पडलेल्या सुधीर पाचर्णे यांच्या दिशेनेही बांदल याने गोळीबार केला.

मात्र, त्यांना काहीही दुखापत झाली नाही. गावात पूर्वी झालेल्या भांडणानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात कैलास पाचर्णे, प्रकाश पाचर्णे यांनी मिटवामिटवी केल्याचा राग मनात धरून बांदल याने त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून धमकावले. दरम्यान या प्रकारानंतर शिरूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याबाबत तडजोड करण्यासाठी सर्वजण एकाच मोटारीतून शिरूर येथे जात असताना तर्डोबाची वाडी जवळील डुंबरीचा मळा परिसरात बाचाबाची होऊन तेथे बांदल याने गोळीबार केला.

या गंभीर घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून, शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकेबंदी केली. दरम्यान, पोलिस निरीक्षक राऊत, स्थानिक गुन्हे अन्वेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, तुषार पंदारे, सचिन घाडगे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, संजय साळवे, विजय जंगम या पथकाने सापळा लावून हल्लेखोरांची धरपकड केली.

Web Title: Crime News Shooting In Shirur Two Injured Three Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top