लॉकडाउन संपला अन् भोरमध्ये...

विजय जाधव
रविवार, 2 ऑगस्ट 2020

भोरमध्ये चोरी व फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे.

भोर  : लॉकडाउन संपल्यानंतर तालुक्यात फसवणूकीच्या आणि चोरींच्या गुन्ह्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून व्यवसाय नसल्यामुळे बाजारात उलाढाल कमी आहे. त्यामुळे सर्वच व्यावसायीक नव्या जोमाने व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत आहेत. याचाच फायदा काही चाणाक्ष लोक घेवून गोड बोलून नागरिकांना फसवत आहेत. याशिवाय गावाकडील फार्महाऊसमधील आणि बंद घरांमधून सामानांची चोरी केली जात आहे. छोटेमोठे व्यवसायीक व व्यापारी यांच्याशी व्यवसासाची आणि उद्योगधंद्याची गोड चर्चा करून त्यांना ठगविण्याचे प्रकार घडू लागले आहेत.

आणखी वाचा - कोरोना लसीसाठी आदर पुनावाला यांनी घेतली मोठी 'रिस्क'

मागील दोन आठवड्यापासून भोर शहर आणि जवळच्या पाच गावांमधील टपरीवजा हॉटेल, किराना दुकानदार व भाजीविक्रेत्यांना दोन जणांनी फसविले आहे. दुकानासमोर दुचाकीवरून एक किंवा दोघेजण येतात, तुमच्याकडे काय-काय मिळेल याची माहिती घेतात. लॉकडाऊनमुळे व्यावसायीकांना कशाप्रकारे तोटा होतो. यावर चर्चा करतात, मी कंत्राटदार आहे असे सांगून मालाची यादी दुकानदाराच्या हातात ठेवतो, हजारो रुपयांचा माल एकदम खपणार असे समजून दुकानदार माल काढून बाजूला ठेवू लागतो. तोपर्यंत संबंधीत तरुण गप्पा मारतो. आमचे कामगार मागील गाडीतून येत आहेत. आणि माझ्या मालकाची मोटारही पाठीमागून येत आहे. माल गा़डीत ठेवून पैसे देण्याचे कबूल करतो. तोपर्यंत फोनवर बोलत राहून कामगारांची गाडी आली आहे, त्यांना पैसे द्यावयाचे आहेत. तुमच्याकडे तीन-चार हजार रुपये असतील तर द्या. काही मिनीटांमध्ये मालाच्या पैशांसोबत तेही देतो. असे सांगून दुकानदारांकडून पैसे घेतो. आणि चालाखी करत गायब होतो. दुकानदारांचा मालही दुकानातच पडून राहातो. काही टपरीचालकांना तर ५० चहा आणि वडापावही बनवायला सांगितले होते. ते तयार होईपर्यंतच हजारो रुपयांची फसवणूक करून संबंधीत तरूण गायब झालेला आहे. 

भोरजवळील शिरवली, करंजे, आंबवडे, आपटी व वडगाव डाळ येथील छोटे व्यावसायीकांना दोन तरुणांनी गंडा घातला आहे. याशिवाय पुण्या-मुंबईतील काही धनिकांनी पसुरे, हिर्डोशी व धरण खोयांमध्ये जागा घेऊन फार्म हाऊस तयार केले आहेत. पसुरे खो-यातील काही फार्महाऊसमधील पैशांबरोबर फरश्या, बांधकामाचे व शेतीचे साहित्य आदींची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

चोरी व फकवणूकींच्यायाबाबत भोर पोलिस ठाण्यात अद्याप एकही तक्रार दाखल झालेली नाही. भोर पोलिस ठाण्याच्या 
हद्दीतीन नागरिकांनी आणि व्यावसायीकांनी अनोळखी व्यकींशी व्यवहार करताना काळजी घ्यावी. काही संशयास्पद वाटल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक राजू मोरे यांनी केले. याखेरीज प्रत्येक गावातील पोलिस पाटीलांना गावात येणा-या आणि आलेल्या संशयीतांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही मोरे यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crimes of theft and fraud are on the rise in bhor taluka