कोरोनाच्या लसीसाठी आदर पुनावालांनी घेतली मोठी 'रिस्क'

रविराज गायकवाड
रविवार, 2 ऑगस्ट 2020

न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आदर पुनावाला यांनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलाय. पुनावाला म्हणाले, 'लस निर्मिती झाल्यानंतर 50 टक्के लस भारतीयांसाठी आणि 50 टक्के विदेशातील नागरिकांसाठी असेल. त्यातही गरीब देशांमध्ये ही लस प्रामुख्यानं वितरीत केली जाईल.'

पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या औषध निर्माण कंपनीकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. ऑक्सफर्ड विद्यापीठाशी झालेल्या करारानुसार आता सीरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. पण, अजूनही चाचणीच्या पातळीवर असलेल्या या लसीच्या निर्मितीसाठी इन्स्टिट्यूटने आणि कंपनीचे सीईओ आदर पुनावाला यांनी खूप मोठी आर्थिक जोखीम उचलल्याचं न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटलंय. न्यूयॉर्क टाईम्सने आदर पुनावाला यांची आणि सीरममधील तज्ज्ञांची एक मुलाखत प्रसिद्ध केलीय. त्यात आदर पुनावाला यांनीदेखील ही मोठी जोखमी असल्याचं मान्य केलंय. 

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतातील चाचणीला परवानगी
ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना लस अद्याप चाचणीच्या पातळीवर आहे. युरोपमध्ये या लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. मात्र, अद्याप भारतात त्याची चाचणी सुरू झालेली नाही. सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार झाला असून, या लसीची भारतातील निर्मितीची जबाबदारी सीरमने घेतली आहे. तत्पूर्वी, या लसीची भारतात चाचणी होणेही गरजेचे आहे. सीरम इन्स्टिट्यूट लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्यात येत आहे. केंद्रीय औषध नियंत्रण संस्था आणि ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) यांनी सीरमला चाचणीसाठी अनुमती देण्याची शिफारस केली आहे. 

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले पुनावाला?
न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आदर पुनावाला यांनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलाय. पुनावाला म्हणाले, 'लस निर्मिती झाल्यानंतर 50 टक्के लस भारतीयांसाठी आणि 50 टक्के विदेशातील नागरिकांसाठी असेल. त्यातही गरीब देशांमध्ये ही लस प्रामुख्यानं वितरीत केली जाईल. अर्थात मोदी सरकारने त्याला आक्षेप घेतलेला नाही. सीरम इन्स्टिट्यूटने या लस निर्मितीचा खर्च स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे. ऑक्सफर्डची लस 70 ते 80 टक्के यशस्वी ठरले. पण, आपण त्याच्या खूप खोलात जाण्याची गरज नाही. जगाला सध्या ज्या वेगाने लसीची गरज आहे. त्या वेगाने लस उत्पादन करणाऱ्या फार कमी संस्था आहेत.' ऑक्सफर्डच्या लस निर्मितीसाठी सीरम अंदाजे 450 मिलियन डॉलर (सुमारे 33 अब्ज 71 कोटी रुपये) खर्च करत असल्याची माहिती पुनावाला यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum institute ceo adar poonawalla statement spendings on covid19 vaccine