महाविद्यालयाच्या "ट्रॅडिशनल डे'मध्ये सराईत गुन्हेगाराची भाईगिरी, विद्यार्थ्यास जबर मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

महाविद्यालयाच्या "ट्रॅडिशनल डे'मध्ये सराईत गुन्हेगाराची भाईगिरी, विद्यार्थ्यास जबर मारहाण

पुणे : महाविद्यालयात "ट्रॅडिशन डे' साजरा होत असतानाच एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांनी महाविद्यालयात घुसून भाईगिरी करीत अक्षरशः दहशत निर्माण केली. त्याचबरोबर टोळक्‍याने एका विद्यार्थ्यासह जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. हि घटना गुरुवारी आंबेगाव खुर्द येथील सिंहगड महाविद्यालयात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

विकास उर्फ विकी जितेंद्र चावडा (वय 29, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक), साहील प्रमोद गायकवाड (वय 19, रा. निवृत्तीनगर, वडगाव बुद्रुक), चेतन संतोष थोरे (वय 19, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक), मोहन धर्मा राठोड (वय 19 , रा. पठाण वस्ती, वडगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासमवेत असलेल्या सहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अथर्व चौधरी (वय 19, रा. धनकवडी) याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स, सायन्स या महाविद्यालयात गुरूवारी "ट्रॅडिशनल डे' साजरा केला जात होता. अथर्व हा त्याच्या मित्र मैत्रीणींसमवेत महाविद्यालयात "ट्रॅडिशनल डे' साजरा करण्यात व्यस्त होता. दरम्यान, सराईत गुन्हेगार विकास चावडा याचे साथीदार व अथर्व यांच्यात यापुर्वी वाद झाला होता. या वादाचा राग चावडाच्या साथीदारांच्या मनात होता.

गुरुवारी चावडा व त्याचे साथीदार महाविद्यालयाच्या आवारात आले. त्यांनी अथर्व चौधरीच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यास बोलावून घेतले. त्यानंतर त्यास दमदाटी करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चावडा याने "मी या कॉलेजचा भाई आहे. तु माझे ऐकत नाही' असे म्हणत अथर्वला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर टोळक्‍याने महाविद्यालयाच्या परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर टोळके पसार झाले. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांना अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक वर्षा घोगरे करीत आहेत.

Web Title: Criminal College Traditional Day Student Beaten Bharti University Police Handcuffed Sinhagad College Ambegaon Khurd

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top