पुण्यात कोरोनाची गंभीर स्थिती; प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये वेटिंग

Critical condition of corona in Pune Waiting in private hospitals
Critical condition of corona in Pune Waiting in private hospitals

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात कोरोनाची लाट आली होती. त्यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. पाठोपाठ मुंबईतही रुग्ण झपाट्याने वाढत होते. यावर्षीही कोरोना रुग्ण प्रामुख्यानं पुण्यात वाढत आहेत. पुणे शहरात गेल्या सव्वा महिन्यापासून कोरोनाची साथ हळू हळू पसरत असताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत रोज दीड ते पावणेदोन हजार रुग्ण सापडत आहेत. त्यातही बहुतांशी रुग्णांना फारशी लक्षणे जाणवत नसल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील 80 टक्के रुग्ण हे लक्षणे नसणारे आहेत. अशा रुग्णांना होम क्वारंटाईन केलं जात आहे. पण, ज्या रुग्णांना आधीपासून ब्लडप्रेशर, मधूमेह किंवा इतर आजार आहेत. त्यांच्या प्रकृतीवर सातत्यानं लक्ष ठेवण्याची गरज असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. मात्र, हॉस्पिटल्समधील उपलब्ध बेडची संख्या आणि अत्यावश्यक सेवेतील कोरोना रुग्णांची संख्या यांचा मेळ बसत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

परिस्थिती वेगळी पण गंभीरच 
पुण्यात गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. त्यावेळच्या आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप फरक असल्याचे दिसत आहे. नव्या लाटेमध्ये क्रिकटल पेशंट्स अर्थात, ऑक्सिजनची गरज असलेले रुग्ण फार वाढलेले दिसत नाहीत. ही संख्या आटोक्यात असली तरी, ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याचे दिसत आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना धाप लागण्याचा त्रास होऊ शकतो त्यांची ऑक्सिजन लेवल घसरू शकते. त्यामुळे अशा पेशंट्सना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे गरजेचे आहे. सध्या ससूनमध्ये जवळपास 150 तर, नायडू रुग्णालयात सुमारे 125 पेशंट्स उपचार घेत आहे. पेशंट्सच्या नातेवाईकांना ओढा खासगी हॉस्पिटलकडे असल्याचं दिसत आहे. दिनानाथ हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, हिंजवडीतील रुबी हॉस्पिटल तसेच औंधमधील कोटबागी हॉस्पिटल इथं रुग्णांना दाखल करण्यासाठी नातेवाईकांची दमछाक होताना दिसत आहे. कोविड पेशंट्साठी खासगी हॉस्पिटल्समधील बेड वाढवावेत, अशी मागणी होत आहे.

हे वाचा - लग्नासाठी सर्जा राजाची जोडी; शेतकऱ्यानं निवडला नवा व्यवसाय

कोरोनाचे 12 हजारांवर रुग्ण
पुण्यात कोरोनाचे नवे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच या आजाराची लक्षणे जाणवणाऱ्या आणि उपचार घेणाऱ्यांची संख्या पावणेबारा हजार झाली आहे. महापालिका आणि खासगी रुग्णालयांत हे रुग्ण आहेत. दुसरीकडे साडेतीनशेहून अधिक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर बाब म्हणजे दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरात रविवारी दिवसभरात १ हजार ७४० रुग्ण सापडल्याची नोंद आहे. विविध केंद्रांच्या माध्यमातून ९ हजार १२२ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

केव्हापासून वाढले रुग्ण
१ ते ४ फेब्रुवारी या काळात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या जेमतेम सातशेपर्यंत होती. परंतु, या कालावधीनंतर रुग्णसंख्येत मोठी वाढ होतानाच रुग्णलयांत दाखल झालेल्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. ही संख्या शनिवारी १० हजार ७२३ होती. रविवारी ती ११ हजार ५९० पर्यंत गेली आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने पुरेशा प्रमाणात बेडची सोय करण्यात येत आहे. त्यात गरजेनुसार व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध केले जात आहेत. यापुढील काळातही ही मागणी वाढणार असल्याने सर्व पातळ्यांवर तयारी केली जात आहे.
- डॉ. संजीव वावरे, साथरोग नियंत्रण अधिकारी, पुणे महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com