esakal | खडकवासला धरणाच्या कडेला खानापूर येथे आढळले मगरीचे पिल्लू
sakal

बोलून बातमी शोधा

Crocodile Hatchling

खडकवासला धरणाच्या कडेला खानापूर येथे आढळले मगरीचे पिल्लू

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी - खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात खानापूर गावाच्या हद्दीतील पाणवठ्याजवळ 4 ते 5 महिन्यांचे मगरीचे पिल्लू आढळले आहे. वनविभागाने नागरिकांच्या सहभागातून तयार केलेल्या प्राथमिक बचाव पथकाच्या जवानांनी (पीआरटी) या मगरीच्या पिलाला पकडले असून ते त्या पिल्लाला कात्रज प्राणी संग्रहालयाच्या ताब्यात देण्यासाठी घेऊन गेले आहेत. दरम्यान मगरीचे पिल्लू आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

आज दि. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खानापूर गावातील पाणवठ्याजवळ मगरीचे पिल्लू असल्याची माहिती पोलीस पाटील गणेश सपकाळ यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ही माहिती वन विभाग व प्राथमिक बचाव पथकाच्या जवानांना दिली. प्राथमिक बचाव पथकाचे तानाजी भोसले, अक्षय जाधव, सुरज कवडे, धवल तुडमवार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन मगरीच्या पिलाला पकडले. यावेळी पोलीस कर्मचारी अजय पाटसकर हेही तेथे उपस्थित होते.

हेही वाचा: पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक !

खडकवासला धरणाला लागून खानापूर, मालखेड व इतर काही गावांतील नागरिकांना मगर दिसत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा वन विभागाकडे यापूर्वी आलेल्या आहेत. यापूर्वीही 2013 साली खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला महाकाय मगर आढळून आली होती. त्यामुळे खडकवासला धरण परिसरात अजूनही काही मगरींचा वावर असण्याची शक्यता वनविभाग व वन्य प्रेमींकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या भागात येणारे पर्यटक व स्थानिक नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभाग व पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

"पर्यटक अत्यंत धोकादायकपणे खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरतात. मगरीने हल्ला केल्यास एखाद्याचा जीव जाऊ शकतो. पर्यटक व नागरिक सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे." सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक हवेली पोलीस ठाणे.

'ज्या अर्थी पिल्लू आढळले आहे त्या अर्थी धरण परिसरात लहान मोठ्या मगरी असण्याची शक्यता आहे. धरणाच्या कडेचे शेतकरी, नागरिक व पर्यटक यांनी सतर्क राहावे. मगर किंवा मगरीचे पिल्लू आढळून आल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.'

- प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी.

loading image
go to top