esakal | पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक !
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi Letter

पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक !

sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ऑनलाईन माध्यमांच्या सुविधांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. ट्रस्टला पत्र पाठवून पंतप्रधानांनी मंडळाचे अभिनंदन केले आहे.

ट्रस्टने यंदा ऑगमेंटेड रिअॅलिटी या तंत्रज्ञानाद्वारे देखील गणेशभक्तांना घरबसल्या आरतीची सुविधा करून दिली आहे. त्यामुळे अशा सर्वच ऑनलाईन सुविधांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून शुभेच्छा संदेशाचे पत्र ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांना पत्र पाठवले आहे. गणेशभक्तांना घर बसल्या व्हर्च्युअल माध्यमांद्वारे गणेशाचे दर्शन व आरतीची सुविधा करुन दिल्याबद्दल मोदी यांनी कौतुक केले आहे.

गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती यंदाच्या गणेशोत्सवात जगभरातील ७० हजार ६०५ गणेशभक्तांनी स्वत:च्या घरातून केली. उत्सवाच्या सहाव्या दिवसापर्यंत सुमारे ६० देशांतील भाविकांनी आॅगमेंटेंड रिअ‍ॅलिटी या ट्रस्टने पुढाकार घेऊन दिलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आरती केली. तर, २० हजारहून अधिक भाविकांनी अनेकदा या तंत्राचा वापर केल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: पुणे : 500 हून अधिक शेतकऱ्यांना 23 कोटीचा गंडा; एकास अटक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात आॅगमेंटेंड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी आॅनलाईन दर्शन घ्यावे, याकरीता या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. डिजिटल आर्ट व्हिआरई चे संचालक अजय पारगे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, ट्रस्टतर्फे दिलेल्या http://www.DagdushethGanpati.net या लिंकवर जाऊन घरी भक्ताने आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात श्रीं ची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होत आहे. आपण गाभा-यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येत आहे. भारतासह अमेरिका, कॅनडा, आॅस्टेÑलिया, युके, युएई, सिंगापूर, जर्मनी, कतार, न्यूझिलंड, ओमान, आर्यलंड, नेदरलँड, मलेशिया, स्विडन, जपान, नायजेरिया, सौदी अरेबिया अशा सुमारे ६० देशांतील भक्तांनी या तंत्राचा वापर केला आहे.

हेही वाचा: मालक म्हणाले, "तुम्ही सगळे लवकर बाहेर पळा मी आलोच"; पण ते आले नाहीत

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विधानपरिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. नीलम गो-हे, स्वामी गोविंददेवगिरी महाराज, माजी सेनाधिकारी डी.बी.शेकटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ.विजय भटकर, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तरिता शंकर, राजू सांकला, अभिनेते प्रशांत दामले यांसह समाजातील अनेक मान्यवरांनी या तंत्रज्ञानाचा वापर करुन बाप्पाची आरती करण्याचा व व्हिडिओद्वारे अनुभविण्याचा आनंद घेतला आहे. भाविकांनी या तंत्राचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

प्रशासनाच्या नियमानुसार मंदिर बंद असून श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

loading image
go to top