शेतकऱ्यानं जगायचं कसं?; पाच महिन्यात तिसऱ्यांदा निसर्गाचा कोप

रवींद्र पाटे
Tuesday, 22 September 2020

जुन्नर तालुक्यातील येडगाव, नारायणगाव व वारूळवाडी परिसरात सोमवारी (ता. २१) दुपारी झालेल्या अतिवृष्टीमुळे  कांदा, बटाटा या पिकांसह द्राक्ष वेली, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्यातील येडगाव, नारायणगाव व वारूळवाडी परिसरात सोमवारी (ता. २१) दुपारी झालेल्या अतिवृष्टीमुळे  कांदा, बटाटा या पिकांसह द्राक्ष वेली, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागाला गेल्या पाच महिन्यात गारपीट (ता. १३ मे), निसर्ग वादळ (ता. ३ जून) व अतिवृष्टी (ता. २१ सप्टेंबर) या नैसर्गिक अवकृपेचा तीन वेळा फटका बसला. त्यातून शेतकरी मात्र उद्ध्वस्त झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येडगाव, नारायणगाव, वारूळवाडी परिसरात सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. याचा सर्वाधिक फटका येडगाव परिसरातील भोरवाडी, बेंदमळा, गणेशनगर या भागाला बसला. पाण्याचा प्रवाहामुळे नुकतेच लागवड केलेले बटाटा बियाणे, कांदा रोपे व ठिबकचा नळ्या वाहून गेल्या. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने शेतातील सुपीक माती वाहून गेली.

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

या भागात १३ मे रोजी झालेल्या गारपिटीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार येडगाव, नारायणगाव भागातील २६४ शेतकरी खातेदारांच्या १८१ हेक्टर क्षेत्रातील क्षेत्रातील उन्हाळी टोमॅटो या प्रमुख पिकासह बाजरी, भाजीपाला पिके, फळबागा आदी पिकांसह पोल्ट्री शेड, जनावरांचे गोठे व घरांचे नुकसान झाले होते. त्यानंतर ३ जून रोजी झालेल्या निसर्ग वादळाचा दुसऱ्यांदा फटका या भागांतील शेती पिकांना बसला होता. सोमवारी (ता. २१) झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकतीच लागवड केलेल्या बटाटा, कांदा या प्रमुख पिकांसह काढणी सुरू असलेल्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. पाच महिन्यात या भागातील शेती पिकांचे तिसऱ्यांदा नुकसान झाले आहे. त्यामुळे बळिराजा मात्र पुरता हतबल झाला आहे.

येडगाव, नारायणगाव परिसरात १३ मे व २१ सप्टेंबर दरम्यानच्या पाच महिन्यात तीन वेळा उभ्या पिकांचे नुकसान झाले. कोट्यवधी रुपयांचा भांडवली खर्च, कष्ट वाया गेले. दोन वेळा पंचनामे झाले, मात्र, अद्याप एक रुपयासुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही. मात्र, कृषी पंपाचे वीजबिल व कर्जाचे व्याज भरावे लागले. त्यामुळे कसे जगायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे आहे.
 - गुलाबराव नेहरकर, माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी येडगाव (ता. जुन्नर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop damage in Yedgaon, Narayangaon and Warulwadi areas