सरकारी नोकरी देतो सांगून फसवणूक; पुणे, नगर कोल्हापूरमध्ये घातला दीड कोटींना गंडा

निलेश बोरुडे
Sunday, 27 December 2020

कोल्हापूर येथे राहणारे प्रमोद रामचंद्र आयरेकर यांनी हवेली पोलिस ठाण्यात बारा लाखांच्या फसवणूकीबाबत तक्रार दाखल केली होती.प्रमोद आयरेकर यांच्या पत्नीला पुण्यातील ससून रुग्णालयात नोकरी लावतो म्हणून आरोपी विजयकुमार पाटील याने रोख बारा लाख रुपये घेतले होते.

किरकटवाडी(पुणे) : शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये नोकरी लावून देतो म्हणून पुणे, नगर व कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेकांना़ कोटींचा गंडा घालणाऱ्या भामट्याला पुणे ग्रामीण हवेली पोलिसांनी अटक केली आहे. विजयकुमार श्रीपती पाटील (वय 54, सध्या राहणार ई-606, ललित, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे. मूळ राहणार श्रीकृष्ण कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर.) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोल्हापूर येथे राहणारे प्रमोद रामचंद्र आयरेकर यांनी हवेली पोलिस ठाण्यात बारा लाखांच्या फसवणूकीबाबत तक्रार दाखल केली होती. प्रमोद आयरेकर यांच्या पत्नीला पुण्यातील ससून रुग्णालयात नोकरी लावतो म्हणून आरोपी विजयकुमार पाटील याने रोख बारा लाख रुपये घेतले होते. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पाटील याने प्रमोद आयरेकर यांच्या पत्नीची निवड झाल्याबाबत बनावट नियुक्तीपत्रही दिले होते परंतु प्रत्यक्षात ससून रुग्णालयात खात्री केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे प्रमोद आयरेकर यांच्या लक्षात आले.त्यानंतर आयरेकर यांनी हवेली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती.याप्रकरणी पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम हे अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अकोले तालुक्यातील अनेकांना गंडा....
याच विजयकुमार पाटीलने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सतरा ते अठरा व्यक्तींना सुमारे सव्वा कोटीच्या पुढे गंडा घातला आहे. अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये लिपिक, शिपाई, शिक्षक अशा पदांवर नोकरी लावतो म्हणून विजयकुमार पाटीलने प्रत्येकी आठ ते दहा लाख रुपये उकळले होते.याबाबत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.

मोठी टोळी असण्याची शक्यता......
आरोपी विजयकुमार पाटीलसह इतरही काही खासगी संस्था चालक व काही 'सावज हेरणारे' एजंट अशी ही मोठी टोळी असण्याची शक्यता आहे, कारण अकोले तालुक्यातील तरुणांना शिरुर तालुक्यातील काही संस्थांमध्ये नियुक्तीही देण्यात आली होती. मात्र त्या संस्था विनाअनुदानित असल्याचे पुढे या तरुणांच्या लक्षात आले.

घर, पैसा असलेले लोकही फक्त 10 हजारांसाठी झालेत फेरीवाले!

फसवणूक झालेल्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे....
"आरोपी विजयकुमार पाटील याने इतरही अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता असल्याने संबंधितांनी पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा व तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे. हे फसणुकीचे संपूर्ण रॅकेट उघडकीस आणले जाणार आहे. तसेच अशा आमिषांना नागरिकांनी बळी पडू नये."
- डॉ अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crore Fraud by saying government offers jobs In Pune Kolhapur nagar and akole