
पर्यटक आणि नागरिकांनी नववर्षाचे स्वागत कात्रजच्या प्राणी संग्रहालयाला भेट देऊन केले आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालयात विक्रमी उत्पन्नाची नोंद झाली.
Katraj Zoo : नववर्षाला कात्रज प्राणी संग्रहालयात अभूतपूर्व गर्दी
कात्रज - पर्यटक आणि नागरिकांनी नववर्षाचे स्वागत कात्रजच्या प्राणी संग्रहालयाला भेट देऊन केले आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालयात विक्रमी उत्पन्नाची नोंद झाली. शनिवारी आणि रविवारी पालकांसाठीही सुटीचा दिवस असतो आणि रविवारी इंग्रजी नववर्षाला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालयात अभूतपूर्व गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. प्राणी संग्रहालयात भेट देण्यासाठी लहान मुलांसह अबालवृद्धांची गर्दी झाली होती.
रविवारी एकूण २५ हजार ७६० पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. यातून प्राणीसंग्रहालयाला ९ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. हा आतापर्यंतचा उच्चांक असून आतापर्यंत म्हणजेच कोरोनाच्या आधीसुद्धा २० हजार पर्यंटकांपर्यंतच गर्दीचा आकडा गेला होता.
तर कोरोनानंतर मे महिन्यात गर्दीने २२ हजारांचा आकडा पार केला होता. यावेळी पहिल्यांदाच २४ हजारांचा आकडा पार केल्याची माहिती प्राणीसंग्रहालय प्रशासनाने दिली आहे. सुटी नसेल त्या दिवशी जास्त गर्दी होताना दिसत नाही. साधारणतः ४ ते ७ हजारांपर्यंत पर्यटक भेटी देत असल्याने दिसून येते. मात्र नववर्ष आणि सुटीचा योग साधून पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती.
प्रतिक्रिया
नववर्ष आणि रविवारच्या सुटीचे औचित्य साधत पर्यटक प्राणी संग्रहालायाला मोठ्या प्रमाणात भेट दिली आहे. प्राणी संग्रहालयाला भेट देण्यासाठी प्राधान्याने येत असलेल्या सर्व वन्यपर्यटकांचे आभार! त्यांच्यासाठी आणखी नवनवीन गोष्टी करण्याचा आमचा कायम प्रयत्न राहील.
- राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणीसंग्राहलय, कात्रज