प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या भावी अधिकाऱ्यांची गर्दी नियंत्रण, वाहतुक नियमन करून "श्रीं'ची सेवा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या भावी अधिकाऱ्यांची गर्दी नियंत्रण, वाहतुक नियमन करून "श्रीं'ची सेवा!

चांदणी चौक असो किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ समोरील चौक, वाहतूक कोंडी हि वाहन चालकांसाठी कायमची डोकेदुखी ठरते.

प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या भावी अधिकाऱ्यांची गर्दी नियंत्रण, वाहतुक नियमन करून "श्रीं'ची सेवा!

पुणे - गणेशोत्सवामध्ये तुम्ही शहराच्या मध्यवर्ती भागात कुठेही गेलात तरीही तुम्हाला ठिकठिकाणी वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र दिसेल, चौकात थांबलेले, त्रस्त झालेले अन्‌ सतत हॉर्न वाजविणारे चेहरे तुमच्या नजरेस पडल्याशिवाय राहणार नाहीत, पण तुम्ही काही प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे व मंडळांसमोर गेलात, तर तुम्हाला काही तरुण मुले मुली अगदी हसतमुखाने चौकात थांबवून इतर वाहनांना, नागरीकांना रस्ता मोकळा करुन देताना दिसतील, त्यामुळे तेथे तुम्हाला ना वाहनांची कोंडी दिसेल, नाही अलोट गर्दी. सारे काही सुरळीत अन्‌ नियमीत. वाहतुक नियमन व गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे हे काम करीत आहेत, चाणक्‍य मंडल परिवार या संस्थेचे 90 हून अधिक स्वयंसेवक. मागील 21 वर्षांपासून गणेशोत्सवात वाहतुक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तरुण कार्यकर्ते, स्वयंसेवक स्वयंस्फुर्तीने हे कार्य करीत स्वतःसह दुसऱ्यांनाही उर्जा देत असल्याचे समाधानकारक चित्रही तुम्हाला दिसेल.

चांदणी चौक असो किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ समोरील चौक, वाहतूक कोंडी हि वाहन चालकांसाठी कायमची डोकेदुखी ठरते. त्यातच गणेशोत्सवामध्ये तर मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी तर सर्वात जटील प्रश्न ठरतो. या वर्षी तर गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच पुणेकर वाहतूक कोंडीत अडकल्याची सद्यस्थिती आहे. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. अनेकदा ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, गरोदर महिला, लहान मुले यांनाही वाहतूक कोंडीचा सर्वाधिक बसतो. शहरातील प्रमुख रस्ते, चौकांमधील हि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चाणक्‍य मंडल परिवार या संस्थेने प्रयत्न सुरू केले. जेथे वाहतूक कोंडी होते, तेथे संस्थेच्या स्पर्धा परीक्षेच्या फाऊंडेशन कोर्सचे विद्यार्थी व स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे अन्य तरुण मुले मुली यांचे समुह वाहतूक नियमन व क्राऊड मॅनेजमेंट करीत आहेत. चाणक्‍य मंडल परिवार या संस्थेचे विश्‍वस्त सिद्धार्थ धर्माधिकारी, सरव्यवस्थापक ज्ञानेश्‍वर तिडके, ईव्हेंट ऑर्गनायझर विशाल थिटे यांच्याकडून या उपक्रमाचे नियोजन केले जाते.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच गर्दी होणारी प्रमुख मंडळे, मानाचे गणपती व अन्य गर्दी होणारी ठिकाणे अशा महत्वाच्या चौकांमध्ये हि तरुण मुले मुली सेवा बजावत आहेत. दररोज सायंकाळी 4.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत हि मुले वाहतूक नियमन करीत आहेत. त्यामुळे काही चौकातील वाहतुक कोंडीचा ताण कमी होत असल्याची चिन्हे आहेत. वाहतुक पोलिसांकडून संबंधित तरुणांना वाहतुक नियमनाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले आहेत. त्यानुसार, हि मुले दररोज काम करीत आहेत. बहुतांश नागरीकांनकडून तरुणांना प्रोत्साहन दिले जाते. नागरीक तरुणांनी दिलेल्या सुचनांचे पालनही करतात. मात्र काही नागरीक तरुणांशी हुज्जत घालून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तरुणांनी सांगितले.

स्वतःचा खर्च मुले स्वतःच करतात

या उपक्रमात सेवा बजावणारे तरुण तरुणी चहा, नाश्‍ता किंवा जेवणासाठी स्वतःच पदरमोड करतात. काही वेळा संबंधित संस्था किंवा वाहतुक पोलिसही मुलांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना चहापाण्यासाठी आग्रह करतात.

'गणेशोत्सवातील वाहतुक कोंडी फोडून वाहतुक नियमन करणे व गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम आमचे स्वयंसेवक दरवर्षी करतात. यावर्षी आम्ही स्वतः पोलिसांना संपर्क साधला. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. सध्या 90 जण सेवा बजावत असून विसर्जनावेळी 250 जण रस्त्यावर वाहतुक नियमन करतील.'

- ज्ञानेश्‍वर तिडके, चाणक्‍य मंडल परिवार.

अशी आहेत या उपक्रमाची वैशिष्ट्ये

- मानाचे गणपती, प्रमुख मंडळे व रहदारीचे चौक येथे तरुणांकडून सेवा

- गणेशोत्सवात सध्या 90 हून अधिक तरुण तरुणी रस्त्यांवर

- क्राउड मॅनेजमेंट व वाहतूक नियमनावर भर

- विसर्जन मिरवणुकीसाठी 250 हून अधिक जण करणार सेवा

- दरवर्षी 500 हून अधिक जणांचा सहभाग

Web Title: Crowd Control Future Officials Administrative Service Traffic Regulation Service Of Ganpati Motivation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..