पुण्यात सोशल डिस्टन्सिंग नाहीच! किराणामालासाठी मार्केट यार्डात गर्दी

प्रवीण डोके
शनिवार, 11 जुलै 2020

दहा ते वीस दिवस लागणारा किराणामाल व इतर घरगुती सामान ग्राहक खरेदी करत आहेत. पुढे लॉक डाऊन वाढणार असल्याची भीती अनेक नागरिकांना आहे. यातून मार्केट यार्डातील या विभागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून चारचाकी, दुचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे लावली जात आहेत. त्यामुळे बाजारात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

मार्केटयार्ड(पुणे) : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाउनच्या काळात बाजार समितीच्या मार्केट यार्ड ही बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासून मार्केट यार्डात मोठ्याप्रमावर नागरिकांनी गर्दी केली आहे. किराणा माल मिळतो की नाही याची नागरिकांना भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांनी किराणा माल, अन्न-धान्य खरेदीसाठी किराणामालाच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दहा ते वीस दिवस लागणारा किराणामाल व इतर घरगुती सामान ग्राहक खरेदी करत आहेत. पुढे लॉक डाऊन वाढणार असल्याची भीती अनेक नागरिकांना आहे. यातून मार्केट यार्डातील या विभागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून चारचाकी, दुचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे लावली जात आहेत. त्यामुळे बाजारात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

बाजारात कुठेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. तसेच सॅनिटायझरचा वापर केला जात नाही. ग्राहकांचे तापमान तपासणीसाठी थर्मल गणचा वापर बाजार समितीने सुरू केला होता. परंतु सध्या तोही बंद आहे. यातून करोना बाबत सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होत असून बाजार समितीसह आरोग्य प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.

लॉकडाऊन वाढेल याची भीती
१० दिवसानंतर पुन्हा लॉकडाऊन वाढेल याची भीती नागरिकांना आहे. यामुळे पुढील काळात किराणामाल मिळणे बंद होईल. या भितीने नागरिक भुसार बाजारातील दुकानांत गर्दी करीत आहेत. मार्केट यार्डातील किराणामालाच्या दुकानांतून गर्दी ओसंडून वाहत आहे.

पुणे जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सोमवारपासून लॉकडाऊन; या गावांचा असेल समावेश

''मार्केट यार्ड उद्या रविवारी ही सुरू आहे. अन्न धान्याचा कोणताही तुटवडा नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये. शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस किराणा, अन्न धान्य नागरिक खरेदी करू शकतात. त्यामुळे मार्केट यार्डात गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्क वापरावा. सर्वांनी बाजार समिती प्रशासनाला सहकार्य करावे.''
- पोपटालाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पूना मर्चंटस् चेंबर.

''शासनाने कोरोनाला अटकाव घालण्यासाठी पुणे शहरात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तू अन्नधान्याची दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मार्केट यार्ड परिसराततील मुख्य बाजारात लोकांनी कारण नसताना अन्नधान्याच्या खरेदीसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडाला आहे. मागील ११० दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये ही अन्नधान्याची बाजारपेठ सुरु होती. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही. तरी आमची शासनाला नम्र विनंती आहे की, त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. आणि अन्नधान्याची मुख्य बाजारपेठ पूर्णपणे सुरु ठेवावी. तसेच या दहा दिवसांच्या लॉकडाऊनमुळे कोरोना पूर्णतः नियंत्रणात येईल असेही वाटत नाही. त्यामुळे सदर लॉकडाऊनमध्ये अन्नधान्याची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला आमचा विरोध आहे.''
- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फाम) 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

Edited By : Sharayu Kakade


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowd in the Pune market yard for groceries