पुण्यात ऐन गर्दीच्या ठिकाणी थरार; शिवीगाळ केली म्हणून मित्रालाच चाकूने भोसकले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ओबेद आणि नबील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी ओबेदने नबीलला शिवीगाळ केली होती. दोघांमधील भांडणाच्या घटनेनंतर नबील तेथून निघून गेला होता.

पुणे : शहरातील खुनाच्या घटना काही दिवसांपासून कमी झाल्याची चिन्हे असतानाच शुक्रवारी (ता.16) सायंकाळी ऐन गर्दीच्या ठिकाणी एका तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली. तरुणाने शिवीगाळ केल्याच्या रागातून त्याचा खून करण्यात आला. ही घटना लष्कर भागातील बाबाजान दर्गा चौकात घडली. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

ओबेद मुजफर कुरेशी (वय 30, रा. भीमपुरा, लष्कर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नबील शब्बीर बेलीम (रा. भीमपुरा, लष्कर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ओबेदचा मावस भाऊ मोहंमद कुरेशी (वय 22, रा. भीमपुरा, कॅम्प) याने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

झोमॅटोची 'आत्मनिर्भर' डिलिव्हरी गर्ल; नोकरी सोडून सुरू केलं फूड डिलिव्हरीचं काम!​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओबेद कुरेशी हा बाबाजान दर्गा चौकाजवळ कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या भिंतीलगत कबाब-पाव खाद्यपदार्थ विक्रीची गाडी लावतो. ओबेद आणि नबील हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ओबेद आणि नबील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी ओबेदने नबीलला शिवीगाळ केली होती. दोघांमधील भांडणाच्या घटनेनंतर नबील तेथून निघून गेला होता.

त्यानंतर सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास नबील पुन्हा ओबेदच्या खाद्यपदार्थांच्या गाडीजवळ आला. त्यावेळी ओबेदने शिवीगाळ केल्याच्या रागातून नबीलने ओबेदवर चाकूने वार केले. या घटनेत गंभीर ओबेद गंभीर जखमी झाला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यास तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अरुण हजारे करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In a crowded place a young man stabbed his friend to death