झोमॅटोची 'आत्मनिर्भर' डिलिव्हरी गर्ल; नोकरी सोडून सुरू केलं फूड डिलिव्हरीचं काम!

सनील गाडेकर
Saturday, 17 October 2020

आसमा या मूळच्या सांगलीच्या. गेल्यावर्षी आलेल्या पुरामुळे त्यांना व्यवसायात मोठे नुकसान सोसावे लागले. नवी सुरवात करण्यासाठी त्यांचे कुटुंब पुण्यात आले. येथे त्यांना एका कॉल सेंटरमध्ये नोकरी लागली.

पुणे : ''गेल्या वर्षभरात एका मागून एक आर्थिक संकट आल्याने आम्ही हैराण झालो आहोत. त्यातून मार्ग काढण्याऐवजी घरी बसले तर हे संकट आणखी बळावेल म्हणून फूड डिलिव्हरी पार्टनर झाले. कोरोनाचा प्रसार वाढत असतानाही मी भर पावसात माझे कर्तव्य पार पाडले. त्यातून येणाऱ्या पैशातून परिस्थिती काहीशी सुधारली आहे. महिलांसाठी हे क्षेत्र अगदीच नवखे आणि आव्हानात्मक. मात्र, काहीतरी साध्य करायचे असेल, तर आव्हाने स्वीकारलीच पाहिजेत,'' असं मोठ्या आत्मविश्‍वासाने आसमा शेख सांगतात.

Video: 'प्लास्टिक बँक'मुळे सोसायट्या होताहेत साफ; 'पुणे प्लॉगर्स'ची अनोखी मोहीम​

आसमा या मूळच्या सांगलीच्या. गेल्यावर्षी आलेल्या पुरामुळे त्यांना व्यवसायात मोठे नुकसान सोसावे लागले. नवी सुरवात करण्यासाठी त्यांचे कुटुंब पुण्यात आले. येथे त्यांना एका कॉल सेंटरमध्ये नोकरी लागली. मात्र, कोरोनामुळे झालेल्या पगार कपातीमुळे खूप कमी पैसे हातात येत. त्यामुळे त्यांनी झोमॅटोबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी त्यांनी स्वीकारलेल्या या आव्हानाबाबत त्या सांगतात की, '' नोकरी परवडत नव्हती, पण दुसरीकडे काम मिळणे मुश्‍कील होते. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू केला. माझे पती गुलाब हे आधीपासून डिलिव्हरी बॉयचे काम करीत आहेत. सुरवातीला 20 दिवस त्यांच्याबरोबर फिरले. मलाही त्यात रस वाढायला लागला. काहीतरी करायचे आहे तर मग ते काय वाईट आहे, असे म्हणून ऑगस्टमध्ये मी डिलिव्हरी गर्ल म्हणून काम सुरू केले.

NEET Result 2020: 'नीट'मध्ये महाराष्ट्राचा नंबर खालून दुसरा; काय आहेत कारणे?​

घरी आलो की ऑर्डरचीच चर्चा :
आसमा या दोन शिफ्टमध्ये काम करतात. सकाळी नऊ ते दोन आणि संध्याकाळी सहा ते दहापर्यंत त्या कामावर असतात. दुपारी घरी आल्यानंतर त्या सासूला मदत करतात. भर पावसात त्यांनी अनेकदा फूड डिलिव्हर केले आहे. सकाळी हे लवकर कामावर जातात. तर दोघेही उशीरा घरी येतो. घरी आलो की दिवसभर किती ऑर्डर केल्या यावरच आमची चर्चा असते, असे आसमा सांगतात.

तुला नोकरी किंवा व्यवसाय शक्‍य नसेल तर घरी बस, असे अनेकदा मला पती आणि सासूने सांगितले. मात्र कुटुंबात माझी देखील काही जबाबदारी आहे. त्या भावनेतून हे काम करू केले आहे. त्यात कुटुंबाचा खूप पाठिंबा असून दोघेही मला समजून घेतात. गाडी चालवताना काळजी घे असा त्यांचा आग्रह असतो.
- आसमा शेख, डिलिव्हरी गर्ल

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asma quit her job and started food delivery with her husband