क्रिप्टोकरन्सीमुळे फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त | Cryptocurrency | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cryptocurrency
क्रिप्टोकरन्सीमुळे फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त

क्रिप्टोकरन्सीमुळे फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - क्रिप्टोकरन्सीमुळे (आभासी चलन) फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याबरोबरच काळ्या पैशांच्या वापरासाठी त्याचा सर्वाधिक उपयोग होऊ शकतो. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीचा फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त होऊ शकतो, अशी भीती बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनी संवाद कार्यक्रमात आभासी चलन चुकीच्या हातात पडू नये, यासाठी लोकशाहीप्रधान देशांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तर क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या वापराबरोबरच त्याच्या वापरास मान्यता मिळण्यासाठी होत असलेल्या मागणीबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ‘आरबीआय’चे गव्हर्नर शशिकांत दास यांनीच क्रिप्टोकरन्सीने ‘आरबीआय’साठी गंभीर चिंता निर्माण केली असल्याचे मत व्यक्त केले आहे.

या पार्श्‍वभूमीवर क्रिप्टोकरन्सीबाबत बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधल्यानंतर त्यांनीही त्याच्या वापराबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण केले. क्रिप्टोकरन्सी भारतीय अर्थव्यवस्थेला धोका पोचवू शकते. सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वच क्षेत्रातील गुंतवणुकदारांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळेच केंद्र सरकार व आरबीआय त्याबाबत सावध भूमिका घेत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून २०१८ मध्ये अमित भारद्वाज व त्याच्या सहकाऱ्यांनी विविध कंपन्या स्थापन करून देशभरातील नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक केली होती. या प्रकरणी दत्तवाडी, निगडी, भोसरी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी अमित भारद्वाज, विवेककुमार भारद्वाजसह आठ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले होते.

हेही वाचा: काळजी वाढली ! पुणे जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्येत वाढ

...तर कायद्यातच करावा लागेल बदल!

क्रिप्टोकरन्सीला मान्यता द्यायची झाल्यास त्यासाठी आर्थिक उलाढालीसंदर्भातील टॅक्‍सेशन किंवा संबंधित सगळ्याच कायद्यात बदल करावा लागेल, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

तस्करीसाठीही बिटकॉईनचा वापर!

बिटकॉईनचा वापर हा बेहिशोबी रकमेच्या गुंतवणुकीसाठी केला जात नसून, बिटकॉईन व अन्य २७ हून अधिक आभासी चलनांचा वापर तस्करीसाठीही केला जातो. ड्रग्जमाफियांकडून तसेच शस्त्र तस्करी, हवाला, शासकीय अधिकाऱ्यांना लाच देणे, जुगार तसेच गुन्हेगारी कृत्यांसाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर बिटकॉईनचा वापर केला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगारी कृत्यांसाठी बेहिशोबी रकमेचा वापर करण्यासाठीही बिटकॉईनचा वापर होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. त्यामुळे प्राप्तिकर, केंद्रीय गुप्तचर विभाग, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्याकडूनही अशा व्यवहारांवर लक्ष ठेवले जाते.

क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली फसवणुकीचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यास मान्यता मिळाल्यास सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढतील. तर काळ्या पैशांचाही वापर वाढेल. भारतीय आर्थिक बाजारपेठेचे वातावरण पाहता क्रिप्टोकरन्सी इथे यशस्वी ठरणार नाही.

- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक फेडरेशन

क्रिप्टोकरन्सी हे शेअर मार्केटप्रमाणे असले तरीही त्यातील धोका ओळखता येत नाही. त्याचा वापर वाढत असला तरीही, तितक्‍याच झपाट्याने ते कोसळूही शकते. क्रिप्टोकरन्सीबाबत आपल्याकडे संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार घडू शकतात. त्याचा सर्वाधिक फटका ठराविक घटकाला बसू शकतो.

- भूषण कोळेकर, बॅंकिंग तज्ज्ञ

क्रिप्टोकरन्सीबाबत ‘आरबीआय’ने सावध राहण्यास सांगितले आहे. मात्र, त्यांनी त्यास बंदी घातलेली नाही. क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढत असून, त्याच्यावर नियमन ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. फसवणुकीसारखे प्रकार टाळण्यासाठी जनजागृती करावी लागेल.

- सौरभ कुलकर्णी, गुंतवणूकदार, क्रिप्टोकरन्सी व इक्विटी

हेही वाचा: ... त्याचे ते शेवटचे आईस्क्रिम ठरले असते

फायदे

 • आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारांना गती प्राप्त

 • प्रत्यक्षात चलन नसल्याने नोटा छापण्याचा खर्च वाचू शकतो

 • आभासी चलनामध्ये गुंतवणुकीत वाढ होऊ शकते

तोटे

 • पाश्चात्त्य देशांत क्रिप्टोकरन्सीची निर्मिती होत असल्याने आर्थिक धोका

 • सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे प्रकार वाढतील

 • सर्वसामान्य नागरिक, गरीब व्यक्तींना फटका बसू शकतो

 • काळा पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतविण्याकडे कल वाढू शकतो

 • देशातील नागरिकांना क्रिप्टोकरन्सीचा वापर करणे अवघड

अमित भारद्वाजच्या बिटकॉईन फसवणूक प्रकरणाची सद्यःस्थिती

 • ५७ - दाखल तक्रारी

 • १७० - फसवणूक झालेले नागरिक

 • १७५० - बिटकॉईनची फसवणूक

 • २०६ - जप्त बिटकॉईन

 • ३८ लाख ९६ हजार - जप्त रक्कम

loading image
go to top