पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक उंची वाढतेय

निगडी - महापालिकेच्या संगीत अकादमीत हार्मोनिअम वादन शिकताना विद्यार्थी.
निगडी - महापालिकेच्या संगीत अकादमीत हार्मोनिअम वादन शिकताना विद्यार्थी.

पिंपरी - ‘साऽ रेऽ, रेऽ गऽ, गऽ मऽ...’ असे सूर एकीकडे ऐकू आले. त्याचवेळी दुसऱ्या कक्षातून हार्मोनिअमचे स्वर कानी पडले. थोडं पुढे गेल्यावर ‘धाऽ धींऽ धींऽ धाऽ... धाऽ तींऽ तींऽ ताऽ...’ या तबल्याच्या बोलांनी लक्ष वेधून घेतले. प्रत्येक कक्षात विद्यार्थी भारतीय बैठकीत बसलेले होते. यात महिला व मुलींची संख्या लक्षणीय होती. गुरुजी तन्मयतेने शिकवत होते. शिष्य एकाग्रतेने ऐकून गुरुजींप्रमाणे गायन, वादन करीत होते. असे चित्र बुधवारी (ता. १३) महापालिकेच्या निगडीतील संगीत अकादमीत बघायला मिळाले. 

शहरातील मुलांना तबला व हार्मोनिअम वादनासह शास्त्रीय व सुगम गायनाचे धडे सहजासहजी मिळावेत, उच्च दर्जाचे सांगीतिक शिक्षण मिळावे, उत्तमोत्तम कलावंत घडावेत, शहराचा सांस्कृतिक दर्जा उंच व्हावा, या उद्देशाने महापालिकेने २००१ मध्ये संगीत अकादमीची स्थापना केली. 
महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत गुरुकुल पद्धतीने संगीत अकादमीचे काम सुरू आहे. तिचे मुख्यालय निगडीतील संत तुकाराम व्यापारी संकुल इमारतीत आहे. चिंचवड, शाहूनगर व संत तुकारामनगर या तीन शाखा आहेत. तेथे विद्यार्थ्यांना गायन व वादनकला शिकवली जाते.

मासिक संगीतसभा अथवा स्वरसागर संगीत महोत्सवानिमित्त अकादमीच्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. अगदी दहा वर्षांच्या मुलांपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठांपर्यंतच्या व्यक्तींना अकादमीत प्रवेश दिला जातो. त्यांना संगीताचे धडे देण्यासाठी स्मिता देशमुख, नंदीन सरीन, वैजयंती भालेराव (गायन); समीर सूर्यवंशी, विनोद सुतार, संतोष साळवे (तबला) आणि उमेश पुरोहित, मिलिंद दलाल, वैशाली जाधव (हार्मोनिअम) हे शिक्षक कार्यरत आहेत. अकादमीसह विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संगीत कलेचा प्रचार व प्रसार सुरू असून, शहराचे सांस्कृतिक वैभव उंचावत आहे. 

सुगम गायन शिकणाऱ्या गृहिणी जयमाला घुगरी म्हणाल्या, ‘‘बालपणापासून गायनाची आवड होती; परंतु काही कारणांमुळे शिकू शकले नाही. आता कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळे गायन शिकते आहे. गायनामुळे एकाग्रता वाढते, मनावरचा ताण कमी होतो. अनेक कार्यक्रमांत गायन केले आहे. रसिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप समाधान देऊन जातो. माझी मुलगी दुसरीत असून ती तबला शिकते आहे.’’

संगीत अकादमीतून अनेक कलावंत घडले आहेत. विद्यार्थ्यांची प्रगती पाहण्यासाठी व त्यांना व्यासपीठीय गायन-वादनाची सवय व्हावी, यासाठी दर महिन्याच्या अकरा तारखेला मासिक संगीतसभा आयोजित केली जाते. त्याला सर्व संगीत शिक्षकांसह नामवंत कलाकार उपस्थित असतात. त्यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते. 
- पराग मुंढे, शिक्षणाधिकारी, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com