पुण्यात मेल आयडी हॅक करून 5 कोटींची फसवणूक

टीम ई सकाळ
Saturday, 16 January 2021

मेल आयडी हॅक करुन खोट्या मेल अकौंटद्वारे बँक डिटेल्स पाठवून जवळपास पाच कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या 

बारामती -  मेल आयडी हॅक करुन खोट्या मेल अकौंटद्वारे बँक डिटेल्स पाठवून जवळपास पाच कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात झुआरी अँग्रो केमिकल लिमीटेड कंपनीने बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला असून सायबर सेलच्या मदतीने या गुन्ह्याची उकल करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. 

या प्रकरणी झुआरी कंपनीच्या वतीने व्यवस्थापक जुजे जोकिम बरेटो (रा. अभितेज गॅलक्सी, बारामती) यांनी फिर्याद दिली. 11 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कंपनीची बारामती एमआयडीसीमध्ये विद्राव्य खत बनविणारी कंपनी आहे. या कंपनीसाठी लागणारा कच्चा माल जगभरातील वेगवेगळ्या कंपन्यांकडून घेतल जातो. कंपनी गेली दहा वर्षांपासून दक्षिण दुबई मधील आरएनझेड इंटरनॅशनल एफझेडई कंपनी या पुरवठादाराकडून कच्चा माल घेते. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

झुआरीने या कंपनीकडून 2 सप्टेंबर 2018 ते 23 सप्टेंबर 2018 या कालावधीत 4 कोटी 97 लाख रुपयांचा माल घेतला. ही रक्कम देण्यासाठी झुआरीने आरएनझेड इंटरनॅशनल कंपनीच्या रमेश आनंदन यांच्या मेल आय़डीवर बॅंक डिटेल्स देण्यासंबंधीचा मेल 11 डिसेंबर रोजी केला होता. 14 रोजी त्यांच्याकडून बॅंक डिटेल्स पाठविण्यात आले. रक्कम जमा केल्यानंतर त्याच्या सॉफ्ट प्रती पाठवाव्यात,  अशी मागणी आरएनझेड कंपनीने केली होती. त्यानुसार झुआरीने आरएनझेड कंपनीला रक्कम पाठवण्याबाबत पणजी येथील युनियन बॅंकेला मेलद्वारे कळविले. 

हे वाचा - CET सेलकडून विद्यार्थ्यांना दिलासा; जात, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ

बॅंकेने 24 डिसेंबर रोजी ही रक्कम झुआरीने दिलेल्या बॅंक खात्यावर वर्ग केली. बॅंकेने रक्कम जमा केल्यानंतर त्यासंबंधीची कागदपत्रे झुआरीला दिली. झुआरीने पुढे ती आरएनझेड कंपनीला पाठवली असता या बॅंक डिटेल्स आमच्या कंपनीच्या नसल्याचे तसेच तुम्ही चुकीच्या खात्यावर पैसे वर्ग केल्याचे आरएनझेड कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानंतर झुआरीने तात्काळ बॅंकेशी संपर्क साधत ज्या खात्यावर पैसे वर्ग केले आहेत, त्या खात्याचा केवायसी तपशील देण्याची मागणी केली. झुआरीचा मेल आयडी हॅक करून वेगळ्याच बॅंक खात्याचे डिटेल्स पाठवून त्यावर रक्कम वर्ग करून घेत फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cyber attack mail hacked zuari compani lost 5 cr