
संकेतस्थळावर सोफा विक्री महागात
पुणे : ऑनलाईन माध्यमाद्वारे गृहपयोगी वस्तुची विक्री करणे एका नागरीकास चांगलेच महागात पडले. गृहपयोगी वस्तु 70 हजार रुपयांना घेतो, असे सांगून सायबर गुन्हेगाराने नागरीकास क्युआर कोड स्कॅन करण्यास भाग पाडून त्यांच्या बॅंक खात्यातील तब्बल पाच लाख रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका नागरीकाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बाणेर रस्ता परिसरात राहात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी जुन्या वस्तु विक्री करणाऱ्या एका संकेतस्थळावर त्यांच्या घरातील जुना सोफा विक्री करण्याबाबतची जाहिरात दिली होती. त्यानंतर सायबर गुन्हेगाराने त्यांच्याशी संपर्क साधला.
त्यांनी सोफा खरेदीचा बहाणा करुन त्यांचा सोफा 70 हजार रुपये इतक्या किंमतीला विकत घेतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या मोबाईलवर एक क्युआरकोड पाठविला. संबंधित क्युआर कोड स्कॅन करुन फिर्यादीने त्यास पाठविला. त्यानंतर फिर्यादीच्या बॅंक खात्यातील पाच लाख सहा हजार 600 रुपये चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान, बॅंक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा मेसेज फिर्यादीस प्राप्त झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांकडे फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत. सायबर गुन्हेगार ऑनलाइन खरेदी विक्रीचा बहाणा करुन नागरीकांची फसवणूक करतात. त्यामुळे नागरीकांनी ऑनलाइन खरेदी विक्री करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारे फसवणुक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
इथे साधा संपर्क -
सायबर पोलिस व्हॉटस्अप क्रमांक - 7058719371, 7058719375
सायबर पोलिस ठाणे - 020-29710097
ई-मेल - crimecyber.pune@nic