esakal | सायबर गुन्हेगारांसाठी पुणेकर ‘सॉफ्ट टार्गेट’
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime

सायबर गुन्हेगारांसाठी पुणेकर ‘सॉफ्ट टार्गेट’

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे @spandurangaSakal

पुणे - विवाह नोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीने एका महिलेस व्यावसायिक असल्याचे सांगून ओळख वाढविली. त्यानंतर समाजमाध्यमांद्वारे त्यांचे संवाद सुरू झाले. पुढे त्याने महिलेसमवेत लग्न करण्याची तयारीही दर्शविली. एकदिवस त्याने महिलेकडे त्याच्या एका प्रकल्पासाठी पैशांची मागणी केली. महिलेनेही कुठलाही विचार न करता तब्बल १६ लाख रुपये ऑनलाइन माध्यमाद्वारे त्याला पाठविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली, या आणि अशा पद्धतीने हजारो ‘स्मार्ट’ पुणेकर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत.

मागील नऊ महिन्यात विविध सायबर गुन्ह्यांच्या प्रकारांमध्ये सर्वाधिक पाच हजार ६७२ हून अधिक फसवणुकीचे गुन्हे हे केवळ ऑनलाइन माध्यमाद्वारे घडले आहेत. त्यापाठोपाठ फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्‌विटर या समाजमाध्यमांद्वारे सायबर गुन्हेगार नागरिकांची सर्वाधिक आर्थिक फसवणूक करीत असल्याचे वास्तव आहे.

शहरात मागील नऊ महिन्यांत साडेबारा हजारांहून अधिक तक्रारी सायबर पोलिसांकडे नोंद झाल्या आहेत. त्यातून पुणेकर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सहजतेने अडकत असल्याचे स्पष्ट होत आहे. डेबीट, क्रेडीट कार्डचा वापर, क्‍यूआर कोड, नोकरी, कर्ज, भेटवस्तू अशा ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारात सर्वाधिक तक्रारी आहेत. त्यापुढे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्‌विटर अशा समाजमाध्यमांचा सतर्कतेने वापर न केल्यामुळे नागरिक सायबर गुन्हेगारांच्या तावडीत सापडत आहेत. तसेच उद्योगांशी संबंधित फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत.

अशी घ्या काळजी

स्वतःची किंवा कुटुंबाची गोपनीय माहिती समाजमाध्यमांवर ठेवू नका

समाजमाध्यमांवर आपली छायाचित्रे, व्हिडिओ अपलोड करण्याचे टाळा

अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना काळजी घ्या

कोणत्याही प्रकारचे क्‍यूआर कोड स्कॅन करू नका

बॅंक किंवा स्वतःसंबंधीची गोपनीय माहिती इतरांना देऊ नका

नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे. कुठल्याही लिंक, ईमेल, व्हिडिओला प्रतिसाद देण्याचे टाळावे. आपल्या हातात वस्तू आल्यानंतरच पैशांचे व्यवहार करावेत. जाहिराती व आमिषांना बळी पडू नये.

- डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

इथे साधा संपर्क

सायबर पोलिस व्हॉट्सॲप क्रमांक - ७०५८७१९३७१, ७०५८७१९३७५

पोलिस ठाणे - ०२०-२९७१००९७

ई-मेल - crimecyber.pune@nic.in

loading image
go to top