तळेगावमध्ये रविवारी सकाळी ‘सायकल डे’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

असा असेल सायकल रॅलीचा मार्ग
तळेगाव दाभाडे मारुती मंदिर चौक-बाजारपेठ-गणपती चौक-शाळा चौक-जिजामाता चौक मार्गे पुन्हा मारुती मंदिर चौकात येथे सांगता होऊईल.

अभिनेत्री राधिका देशपांडे मुख्य आकर्षण 
स्वराज्यरक्षक संभाजी, झाँसी की रानी आणि राजकुँवर या मालिकांमध्ये काम केलेली मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे ही ‘सायकल डे’चे मुख्य आकर्षण असणार आहे.

तळेगाव स्टेशन - रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटी आणि सकाळ सोशल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तळेगावात रविवारी (ता. ९) सकाळी ‘सायकल डे’चे आयोजन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळी आठ वाजता मारुती मंदिर चौकापासून ‘सायकल डे’ला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविला जाईल. पर्यावरण रक्षण आणि रस्ता सुरक्षा नियमांविषयी जनजागृती केली जाणार आहे. या रॅलीमध्ये नोंदणी केलेल्या सायकलस्वारांना मोफत टी शर्ट आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे. ‘सायकल डे’त मुले, महिला, विद्यार्थी, तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होता येईल. 

आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, ‘सीआरपीएफ’चे उपमहानिरीक्षक ब्रिजेंद्रकुमार टोपो, ‘रोटरी’चे जिल्हा प्रांतपाल रवी धोत्रे, पंकज शहा, गणेश खांडगे आणि सकाळ सोशल फाउंडेशनचे प्रतिनिधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘सायकल डे’ यशस्वी करण्यासाठी रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटीतर्फे संस्थापक विलास काळोखे, अध्यक्ष ढमाले, दिलीप पारेख, संतोष शेळके, दीपक फल्ले, राजेश गाडे-पाटील यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी आणि सकाळ सोशल फांउडेशनचे स्वयंसेवक व्यापक नियोजन करीत आहेत. सायकल रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबरोबरच रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

‘सायकल डे’मध्ये तळेगावातील शाळांमधून एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतील, असा अंदाज आहे. ‘सायकल डे’मध्ये नोंदणीकृत सहभागी सायकलपटूंना रोटरी क्‍लब आणि ‘सकाळ’च्या वतीने लकी ड्रॉ पद्धतीने सोडतीतून तीन सायकलींची भेट मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cycle Day at sunday in talegav