राजस्थानमधील रामदेवरा यात्रेसाठी पुण्यातून सायकलवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cycle tour from Pune for Ramdevra Yatra in Rajasthan

राजस्थानमधील रामदेवरा यात्रेसाठी पुण्यातून सायकलवारी

कात्रज - राजस्थान येथील जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा यात्रेसाठी पुण्यातील श्री बाबा रामदेव सोशल ग्रुप तब्बल १३०० किलोमीटरची सायकलवारी करणार आहे. रूनेचा धामपर्यंत एकूण १० दिवसांत ही सायकलवारी पूर्ण करण्यात येणार असून यामध्ये एकूण २८ सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला आहे.

या प्रवासासाठी सायकलींचे सहकार्य महेश नागरी मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटीचे संस्थापक स्व. धनराज राठी यांच्या स्मरणार्थ मैनाबाई धनराज राठी आणि परिवाराने केले आहे. या सायकलींचे वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी मगराज राठी, धनराज भाटी, अविनाश कोठारी, मांगीलाल परिहार, मगराज राठी, महावीरसिंह शेखावत, शैलेश चौधरी, महेंद्र छाजेड, अनिल लखन, चुन्नीलाल राठी, राजेश राठी उपस्थित होते. हिंदू महिन्यांनुसार भाद्रपद महिन्यात दरवर्षी राजस्थानमध्ये ही यात्रा भरते. बाबा रामदेव यांच्या श्रद्धेपोटी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांतील राजस्थानी समाज याठिकाणी येतो. ही सायकलवारी दरवर्षी करण्यात येत असून यंदा या सायकलवारीचे हे पाचवे वर्ष आहे. पुणे-लोणावळा-मुंबई-सुरत मार्गे ही सायकलवारी राजस्थानमध्ये पोहोचेल. दररोज साधारणतः १३० ते १४० किमीचा प्रवास करण्यात येणार आहे.

बाबा रामदेव हे महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबांप्रमाणे आहेत. बाबा रामदेव यांना राजस्थानमध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजाचे लोक मानतात. बाबांना विष्णूचा अवतार मानले जाते आणि त्यांना रामदेव पीरसुद्धा म्हटले जात असल्याने ते हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहेत. बाबांच्या श्रद्धेपोटी भाद्रपद महिन्यातील दुजेच्या दिवशी साधारणतः १५ लाख भाविक याठिकाणी जमत असल्याची माहिती मगराज राठी यांनी दिली.