

अमरावती, ता. २७ ः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णव’ चक्रीवादळाचे आज अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. हे चक्रीवादळ उद्या (ता.२८) दुपारी यनमजवळ बापटला आणि विशाखापट्टणमदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी १२५ ते १३५ कि.मी.दरम्यान राहण्याचा अंदाज असून तो १५०कि.मी. प्रतितासपर्यंतही पोचू शकतो, अशी माहिती हवामान खात्याच्या (आयएमडी)भुवनेश्वर विभागाच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी दिली.
आंध्रच्या किनाऱ्यावर धडकताना चक्रीवादळाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशसह शेजारच्या ओडिशा राज्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा व तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीच्या चक्रीवादळ इशारा केंद्राचे संचालक पी.एल.एन. मूर्ती यांनी सांगितले, की सोमवारी हे चक्रीवादळ प्रतितास २३. कि.मी.वेगाने उत्तरेकडे सरकत होते. आज दुपारी अडीचच्या दरम्यान त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. ते उद्या(ता. २८) यनमजवळ बापटला व विशाखापट्टणमदरम्यान आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. राज्यातील काकिनाडा,विशाखापट्टणम, गंगावरमला धोक्याचा इशारा जारी करण्यात आला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
चक्रीवादळाशी सामना
आंध्र प्रदेश : काकिनाडा बंदरावरील जवळपास ९०हजार जणांना १०१ मदत छावण्यांत हलविले. राज्यातील १८ जिल्ह्यांतील २.७० कोटी लोकांना मोबाइलवर चक्रीवादळाचे ‘अलर्ट’. एकूण ३० हजार नौका किनाऱ्यावर. दोन हजारांहून अधिक ठिकाणी छावण्या उभारल्या.
तेलंगण : राज्यातील ३३ जिल्ह्यांत पावसाची शक्यता. चार जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’. प्रशासनाला दक्षतेचे आदेश
छत्तीसगड : अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर छत्तीसगड सरकारचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अतिदक्षतेचे निर्देश. शून्य जीवितहानीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विनाअडथळा वैद्यकीय सेवा, बचाव छावण्या उभारणार
नेपाळ, श्रीलंकेतही धास्ती
‘अर्णव’ चक्रीवादळाने अतितीव्र रुप धारण केल्याने श्रीलंकेसह नेपाळनेही जोरदार पूर्वतयारी केली आहे. मुसळधार पावसामुळे अचानक पूर येण्याची व दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन श्रीलंकेने शाळांना सुटी दिली आहे. नुकतेच भूस्सखलनाचा सामना केलेल्या नेपाळमध्येही २८ ते ३१ दरम्यान अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. चक्रीवादळ आंध्रला धडकल्यानंतर तीव्रता कमी होऊन कमी दाबाच्या क्षेत्राच्या रूपात नेपाळकडे सरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नेपाळमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची व बर्फवृष्टीची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.