''अर्णब''पाठोपाठ आता ''मुरासू'' चक्रीवादळ

''अर्णब''पाठोपाठ आता ''मुरासू'' चक्रीवादळ
Published on: 

‘अर्णब’पाठोपाठ आता ‘मुरासू’ चक्रीवादळ

आंध्रच्या किनारपट्टीजवळ सोमवारी पोहोचणार

सकाळ न्यूज नेटवर्क
पुणे, ता. ३१: अर्णब चक्रीवादळापाठोपाठ आता बंगालच्या उपसागरामध्ये ‘मुरासू’ चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. हे चक्रीवादळ दोन नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहचण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे शनिवारी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात (डिप्रेशन) रूपांतर झाले. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, एक नोव्हेंबरला त्याची तीव्रता आणखी वाढून चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते. चक्रीवादळांच्या संभावित नावांच्या क्रमानुसार आगामी चक्रीवादळाचे नाव भारताने सुचवल्यानुसार ‘मुरासू’ असेल. ‘मुरासू’ या तमिळ शब्दाचा अर्थ नगारा असा आहे. मुरासू चक्रीवादळसुद्धा अर्णब चक्रीवादळाप्रमाणे आंध्र प्रदेशच्या दिशेने प्रवास करणार असून, दोन नोव्हेंबरच्या संध्याकाळी वादळ आंध्र प्रदेश आणि यानम किनारपट्टीजवळ पोचेल, असे आयएमडीने म्हटले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, दोन नोव्हेंबरच्या रात्री किनारपट्टी ओलांडल्यावर तीन नोव्हेंबरच्या रात्री चक्रीवादळाचे अवशेष अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राच्या स्वरूपात तेलंगणपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. हा अंदाज खरा ठरल्यास तीन आणि चार नोव्हेंबरला लगतच्या मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुरासू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडूसह तेलंगण, छत्तीसगड या राज्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

थंडीचे आगमन लांबले
देशात नोव्हेंबरमध्ये कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून, या महिन्यात दक्षिण भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. आयएमडीने शनिवारी जाहीर केलेल्या मासिक हवामान अंदाजानुसार, राज्यासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये थंडीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. नोव्हेंबरमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. या महिन्यात मराठवाड्यात सरासरीइतके किमान तापमान, तर राज्यात इतरत्र सरासरीपेक्षा जास्त किमान तापमान नोंदले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.