esakal | लॉकडाउनच्या धास्तीने बारामती आगाराचे रोजचे चार लाखांचे नुकसान

बोलून बातमी शोधा

ST Bus
लॉकडाउनच्या धास्तीने बारामती आगाराचे रोजचे चार लाखांचे नुकसान
sakal_logo
By
- मिलिंद संगई

बारामती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व घटलेली प्रवासी संख्या या मुळे एसटीच्या बारामती आगाराला दररोजचा किमान चार लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनापश्चात सावरु पाहणारी एसटी पुन्हा एकदा विस्कळीत होणार अशी चिन्हे दिसू लागली आहे. लॉकडाऊनचे वारे वाहण्याअगोदर व गतवर्षीचे लॉकडाऊन झाल्यानंतर बारामती आगार हळुहळू पूर्वपदावर येत होते, आता मात्र फे-या, प्रवासी संख्या व उत्पन्न या सर्वात घट होऊ लागली आहे. लॉकडाऊन होणार या भीतीनेच प्रवाशांनी प्रवासाचे बेत रद्द केल्याचा परिणाम एसटीवरही जाणवला. वास्तविक एसटीच्या दृष्टीने उन्हाळ्याचा काळ सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा असतो, यंदा मात्र दिवसागणिक चार लाखांच्या आसपास तोटा सहन करण्याची पाळी आली आहे. पूर्वी उन्हाळ्यात एसटीत उभे राहायला जागा नसायची इतकी गर्दी होत असायची, आता 44 आसनक्षमतेच्या बसमध्ये निम्मे प्रवासी आले तरी कर्मचारी आनंदीत होतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु....

वरिष्ठ आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, धुळे, कोल्हापूर, बीड, हैदराबाद, जालना, पैठण, श्रीरामपूर या सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या सुरु आहेत. बारामती पुणे मार्गावर शिवशाहीची बस धावत असून मोरगाव जेजुरी सासवडच्या प्रवाशांसाठी वाहक असलेल्या गाड्या सोडल्या जात आहेत. लॉकडाऊनची चर्चा सुरु होण्यापूर्वी महिन्याला किमान 14 लाखांचे उत्पन्न असलेल्या बारामती आगाराचे उत्पन्न आता दहा लाखांपर्यंत खाली आले आहे. पूर्वी दिवसाला 300 फे-या व्हायच्या आता ही संख्या 180 वर आली आहे. प्रवाशांअभावी काही फे-या रद्दही कराव्या लागल्या.

काळजी घेऊन कामकाज सुरु....

दरम्यान बारामती बसस्थानक दर तासाला सॅनेटाईज करण्यासोबतच एका मोठ्या पंपाच्या मदतीने प्रवाशांनाही सॅनेटायझर देण्याची व्यवस्था केली जात आहे. सर्व शासकीय नियमांचे पालन करुनच प्रवासास परवानगी दिली जात आहे.