डेमलर इंडियाची चार हजार कोटींची गुंतवणूक

डेमलर इंडियाची चार हजार कोटींची गुंतवणूक
Published on

‘डेमलर इंडिया’ची चार हजार कोटींची गुंतवणूक

चेन्नई, ता. १४ः भारतातील भारतबेंझ ट्रक आणि बसेस; तसेच व्यावसायिक वाहन परिसंस्था अधिक मजबूत करण्यासाठी डेमलर इंडिया कमर्शियल व्हेइकल्स कंपनीने तमिळनाडूमध्ये सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त गुंतवणुकीची घोषणा केली आहे. याबाबत तमिळनाडू इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हमध्ये तमिळनाडू सरकारसोबत एक सामंजस्य करार करण्यात आला.
या प्रस्तावित गुंतवणुकीमुळे भारतातील डेमलर इंडिया कमर्शियल व्हेइकल्सची एकूण गुंतवणूक १४,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होणार आहे. उत्पादनविकास, उत्पादनक्षमता, संशोधन व विकास, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील तंत्रज्ञानासाठी ही गुंतवणूक करण्यात येणार असून, त्यातून सुमारे ४०० रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या गुंतवणुकीमुळे भारतबेंझचा उत्पादन विकास, स्थानिक पुरवठादारांचे जाळे, देशव्यापी सेवा व्यवस्था आणि सुट्या भागांची उपलब्धता अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर डेमलर ट्रकच्या जागतिक उत्पादन आणि पुरवठा साखळीत भारताचे महत्त्वही वाढणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने ७० हून अधिक बाजारपेठांमध्ये ७५,००० हून अधिक ट्रक आणि बसेस; तसेच ३३ कोटींहून अधिक सुट्या भागांची निर्यात केली आहे. याशिवाय चेन्नईहून जर्मनीतील डेमलर ट्रकच्या प्रकल्पांनाही काही महत्त्वाच्या यंत्रणांचा पुरवठा केला जातो. कंपनीचे चेन्नईजवळील ओरगडम येथे ४०० एकरांवर उत्पादन आणि संशोधन-विकास केंद्र असून, येथे ४,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीला ४०० हून अधिक स्थानिक पुरवठादारांचे पाठबळ आहे.


या गुंतवणुकीबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टॉर्स्टेन श्मिट म्हणाले, ‘‘भारतबेंझची उभारणी भारतासाठी करण्यात आली आहे. ही गुंतवणूक देशातील व्यावसायिक वाहनांच्या विकासाच्या पुढील टप्प्याबद्दलचा आमचा विश्वास दर्शवते. पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, खाणकाम, बांधकाम आणि प्रवासी वाहतूक क्षेत्रांचा विस्तार होत असताना भारतीय ग्राहकांना अधिक वाहन उपलब्धता, विश्वासार्ह आणि कार्यक्षम ट्रक व बसेसची गरज आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com