

डेअरी उद्योगात तेजी
- दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर चार रुपयांची वाढ
- शेतकऱ्यांकडील दूध खरेदी दर वधारण्याची शक्यता
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्याच्या डेअरी उद्योगात सध्या तेजी असून, दुधाच्या खरेदी दरात आणखी वाढ करण्याची तयारी खासगी व सहकारी दूध प्रकल्पांनी ठेवली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील संतुलन राखण्यासाठी विक्री दरात प्रति लिटर चार रुपये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे.
शेतकऱ्यांकडील दूध खरेदी दरातील तेजी टिकून राहण्यासाठी दुधाच्या विक्री दरात वाढ होणे गरजेचे असते. विक्री दर अधिक असल्यास खरेदी दरदेखील चांगला देणे डेअरीचालकांना आर्थिकदृष्ट्या शक्य होते. तसेच दूध भुकटी व लोण्याच्या बाजारात तेजी असल्यास खरेदी दर अधिक देणे शक्य होते. सध्या भुकटी व लोण्याचे दर तसेच दुधाचे खरेदी दर अशा तिन्ही आघाड्यांवर तेजी असल्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या गाय व म्हैस दुधाला यापुढेही चांगले दर मिळू शकतात, असे डेअरी उद्योगातून सांगण्यात आले.
दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत १० टक्के वाढ
डेअरी उद्योगातील घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने शुक्रवारी (ता. १३) बैठक बोलावली होती. संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, की इंधनाचे दर, साखरेचे दर, पॅकिंग व वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. याशिवाय शेतकऱ्यांकडील दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. तसेच, खरेदी दर पुढील काळात वाढण्यास अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे विक्री दरात वाढ करायला हवी, असा आग्रह डेअरीचालकांनी या बैठकीत धरला. त्यानंतर संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनीही विक्री दरवाढीला अनुकूलता दर्शविली. त्यामुळे उद्यापासून (ता. १) गाय व म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर चार रुपये वाढ होईल. तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत दहा टक्के वाढ केली जाणार आहे.
खरेदी दरात मंदीची शक्यता मावळली
राज्यातील प्रमुख डेअरी प्रकल्पांनी विक्री दरात यापूर्वीच वाढ केलेली आहे. नंदिनीने दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर आठ रुपये, अमूलने चार रुपये, मदर डेअरीने सहा रुपये, तर गोकुळने दोन रुपयांची वाढ केली आहे. दुधाचे विक्री दर चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरेदी दरात मंदी येण्याची शक्यता आता मावळली आहे. सध्या शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रति लिटर ४२ ते ४३ रुपये, तर म्हैस दुधासाठी ५५ ते ५७ रुपयांपर्यंत खरेदी दर मिळतो आहे. दुसऱ्या बाजूला डेअरी उद्योगात सध्या दूध भुकटीला प्रति किलो २९० ते ३०० रुपये, तर लोण्याला ५५० रुपयांपर्यंत दर दिला जातो आहे. भुकटी व लोण्यातील तेजी शेतकऱ्यांच्या खरेदी दराला उपयुक्त ठरते आहे, असे डेअरी उद्योगाचे म्हणणे आहे.
कोट
दुष्काळी स्थितीत राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे खरेदी दर आणखी चांगले देण्याचा प्रयत्न डेअरी उद्योगाचा आहे. सध्या दूध भुकटी व लोण्याचे दर तेजीत असून, त्यात वाढ झाल्यास शेतकऱ्यांना खरेदी दर तात्काळ वाढवून देण्याकडे डेअरीचालकांचा कल राहील.
- प्रकाश कुतवळ, सचिव,
महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ
राज्यातील दुष्काळी स्थिती तसेच बाजारपेठेत दूध व दुग्धजन्य पदार्थांना असलेल्या मागणीमुळे शेतकऱ्यांना दुधाचे खरेदी दर वाढवून देण्यास अनुकूल स्थिती तयार झाली आहे. म्हैस दुधाला ७ फॅट व ९ एसएनएफकरिता प्रति लिटर ६५ रुपयांपर्यंत, तर गाय दुधाला ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी ४१ रुपये आणि ४ फॅट व ८.५ एसएनएफसाठी ४२.५० रुपये मिळू शकतील.’’
- श्रीपाद चितळे, संचालक, चितळे डेअरी उद्योग समूह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.