आयातीपासून मूल्यवर्धनापर्यंत संपत्तीनिर्मितीचे ‘चिनी मॉडेल’

आयातीपासून मूल्यवर्धनापर्यंत संपत्तीनिर्मितीचे ‘चिनी मॉडेल’
Published on

आयातीपासून मूल्यवर्धनापर्यंत संपत्तीनिर्मितीचे ‘चिनी मॉडेल’
--
कच्चे ‘सी फूड’ आयात करून दालीयान बनले जागतिक प्रक्रिया केंद्र
--

ॲग्रोवन वृत्तसेवा

दालीयान : अमेरिकेसह विविध देशांतून कच्चा ‘सी फूड’ आयात करून त्यावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन करत देशांतर्गत, तसेच जागतिक बाजारपेठेत पोहोचविण्याची भक्कम साखळी चीनमधील दालीयान शहराने उभारली आहे. बंदर, शीतगृहे, प्रक्रिया उद्योग आणि दळणवळण सुविधांच्या बळावर दालीयानने जागतिक सीफूड व्यापारातील प्रमुख केंद्र म्हणून ओळख निर्माण केली आहे.

अमेरिकी कृषी विभागाने दालीयानच्या बाजारपेठेबाबत विशेष अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, २०२५ मध्ये दालीयानचे सकल देशांतर्गत उत्पादन १४३ अब्ज डॉलरवर पोहोचले. एक ट्रिलियन युआनची आर्थिक पातळी गाठणारे हे ईशान्य चीनमधील पहिले शहर ठरले. शहराची लोकसंख्या सुमारे ७५ लाख ४० हजार असून, दरडोई सकल उत्पन्न १८ हजार २०० डॉलरवर पोहोचले आहे.

आयातीत माशांवर मूल्यवर्धन

अमेरिकेतून अलास्का पॉलॉक, कॉड आणि साल्मन यांसारखे मासे मोठ्या प्रमाणावर गोठविलेल्या स्वरूपात दालीयानमध्ये आयात केले जातात. या कच्च्या मालावर शहरातील शेकडो लहान-मोठ्या कारखान्यांमध्ये कटिंग, फिलेटिंग आणि आकारानुसार तुकडे करण्याची प्रक्रिया होते. त्यापासून विविध मूल्यवर्धित सी फूड उत्पादने तयार केली जातात.

प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना चीनमधील हॉटेल, रेस्टॉरंट आणि सुपरमार्केटमध्ये मोठी बाजारपेठ मिळते. त्याचबरोबर या उत्पादनांची विविध देशांमध्ये निर्यातही केली जाते. त्यामुळे कच्च्या मालाच्या आयातीपासून प्रक्रिया, पॅकेजिंग, विक्री आणि निर्यातीपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी दालीयानमध्ये विकसित झाली आहे.

बंदरामुळे मिळाली ताकद

सीफूडची आयात, प्रक्रिया आणि वाहतुकीसाठी दालीयानच्या बंदराची मोठी साथ मिळाली आहे. बंदरावर सुमारे ८० विशेष धक्के असून, त्यांपैकी ३८ खोल पाण्यातील धक्के आहेत. येथे तीन लाख टनांपर्यंतच्या मालवाहू जहाजांची हाताळणी करता येते. दयाओवान मुख्य कंटेनर टर्मिनलवर सीमाशुल्क नियंत्रित शीतगृह सुविधाही उपलब्ध आहे.

प्रक्रिया केलेला माल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीद्वारे लियाओनिंग, जिलीन, हेलॉन्गजियांग आणि पूर्व इनर मंगोलिया या ईशान्य चीनमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये पाठविला जातो. बंदर ते प्रक्रिया उद्योग आणि तेथून बाजारपेठेपर्यंत सक्षम वाहतूक व्यवस्था उभारल्यामुळे दालीयानला जागतिक प्रक्रिया केंद्र म्हणून विकसित होता आले.

आयात-निर्यातीची मोठी उलाढाल

२०२५ मध्ये दालीयानमधून २८.६९ अब्ज डॉलरची आयात, तर ३३.८९ अब्ज डॉलरची निर्यात झाली. पर्यटन क्षेत्रातूनही शहराला २७.८ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला. शहरातील मोठी किरकोळ बाजारपेठ, हॉटेल-रेस्टॉरंट क्षेत्र आणि ऑनलाइन किराणा व्यासपीठांमुळे प्रक्रिया केलेल्या सी फूडला स्थानिक पातळीवरही मोठी मागणी आहे.

कमोडिटी एक्सचेंजसाठीही दालीयानची ओळख

दालीयान हे केवळ सीफूड प्रक्रिया केंद्र नसून जागतिक कृषी वायदे बाजारातही या शहराला महत्त्वाचे स्थान आहे. जगातील प्रमुख वायदे बाजारांपैकी एक असलेले ‘दालीयान कमोडिटी एक्सचेंज’ याच शहरात आहे. या एक्सचेंजवर सोयाबीन, सोयाबीन डीओसी अर्थात सोयामील, मका, पाम तेल आणि जिवंत डुकरे यांसारख्या कृषी मालाचे वायदे व्यवहार होतात. दालीयान बंदरातून होणारी सोयाबीनची मोठी आयात आणि कमोडिटी एक्सचेंजवरील प्रचंड उलाढाल यामुळे जागतिक सोयाबीन व पशुखाद्याच्या दरांवर दालीयानचा लक्षणीय प्रभाव असल्याचे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com