डांगे चौक अतिक्रमणांच्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पिंपरी - हातगाडी, टेम्पो, पथारी व्यावसायिक यांच्या अतिक्रमणांसह पदपथ, दुभाजक, बीआरटी मार्ग येथेही विक्रेत्यांची अतिक्रमणे यामुळे डांगे चौक परिसरात दर रविवारी मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे येथील नागरिक हैराण आहेत. 

पिंपरी - हातगाडी, टेम्पो, पथारी व्यावसायिक यांच्या अतिक्रमणांसह पदपथ, दुभाजक, बीआरटी मार्ग येथेही विक्रेत्यांची अतिक्रमणे यामुळे डांगे चौक परिसरात दर रविवारी मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे येथील नागरिक हैराण आहेत. 

डांगे चौकात आजूबाजूच्या गावातील शेतकरी विक्रीसाठी येतात. मात्र, गेल्या काही वर्षात थेरगाव, डांगे चौक परिसरात हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांची लोकवस्ती वाढली आहे. हे कर्मचारी शनिवार, रविवारी फिरण्यासाठी तसेच खरेदीसाठी बाहेर पडतात. परिणामी, डांगे चौकातील वाहतूक समस्येमध्ये मोठी भर पडते. गणेशनगरहून डांगे चौकाच्या दिशेला रस्त्यालगत भाजीपाला, फळे, यासह विविध वस्तू विक्रीच्या हातगाड्या, टेम्पो लागलेल्या असतात. तर, डांगे चौकापासून ताथवडेकडे जाणारा मार्ग, ताथवडेकडून डांगेचौकाकडे येणाऱ्या मार्गावर रस्त्यामध्ये, पदपथांवर विक्रेते बसतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही मुश्‍कील होते. रावेत-औंध बीआरटी मार्गातही विक्रेते बसतात. त्यांना हटविण्याचा पोलिसांनी अनेकदा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. गणेशनगरहून डांगे चौकाकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू असते. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होतात. परिणामी, कोंडीत अधिकच भर पडते.

आठवडे बाजारात ताजी भाजी, फळे रास्त भावात मिळतात. त्यामुळे दर रविवारी येथे खरेदीसाठी येतो. मात्र, वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा नसते. महापालिका प्रशासनाने येथील बेकायदा विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. 
- नितीन जाधव, नागरिक, वाकड

डांगे चौकातील अतिक्रमणे हटविण्याबाबत स्थानिक व्यापाऱ्यांशी प्राथमिक बैठक झाली आहे. चौकातील केवळ सहा हातगाडी व्यावसायिकांकडेच महापालिकेचे अधिकृत परवाने आहेत. चौकातील कोंडीची समस्या सोडविण्याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येईल. 
- सतीश माने, पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे

Web Title: Dange Chowk Encroachment