रस्ते खोदाईत धोका कायमच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

येथे आहेत धोके

  • आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ गुरुद्वारा परिसरात जलवाहिनीसाठी खोदकाम
  • रावेतमधील भोंडवे कॉर्नर परिसरात पथपदांसाठी खोदकाम
  • वडमुखवाडी रस्त्यावर अलंकापुरम सोसायटी परिसरात रस्त्यासाठी खोदकाम; राडारोडा पडून
  • टेल्को रस्त्यालगत यशवंतनगर चौकात सेवा वाहिनीसाठी खोदकाम, खडी-मुरूम रस्त्यावर
  • बिजलीनगर भुयारी मार्गाचे काम संथ गतीने, रस्त्यावर खडी पसरलेली
  • वाल्हेकरवाडी रस्ता काम थंडावले; मात्र, खोदकामामुळे खड्डे कायम
  • औंध-रावेत बीआरटी मार्गावर १६ नंबर बसथांबा परिसरात काँक्रिटीकरणासाठी खोदाई
  • इंद्रायणीनगर परिसरात जुना दुभाजक काढून नवीन केला जात आहे
  • भोसरीतील शांतिनगर परिसरात रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट, खडी पसरलेली
  • पिंपरीतील जयहिंद स्कूल परिसरात जलवाहिनीसाठी मोठा खड्डा

पिंपरी - शहरात विविध विकासकामांसाठी खोदकाम केले जात आहे. तेथे झालेल्या अपघातांमध्ये महिनाभरात दोघांचा बळी गेला. तरीही प्रशासनाला जाग आली नाही. अद्यापही धोकादायक पद्धतीने कामे सुरू असून ‘नागरिकांच्या जिवाची पर्वा ना प्रशासनाला, ना ठेकेदारांना’ अशी स्थिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जलवाहिन्या व सांडपाणीवाहिन्यांसह अन्य सेवा वाहिन्या टाकण्यासाठी आणि रस्त्यांची निर्मिती, काँक्रिटीकरणासाठी अनेक ठिकाणी खोदकामे सुरू आहेत. त्यासाठी सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. दीड महिन्यात खोदकाम केलेल्या ठिकाणी तिघांचा बळी जाऊनही प्रशासन सुस्त आहे. ठेकेदारांकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचे मंगळवारी (ता. २८) आढळून आले. 

फुगेवाडीतील पाण्याच्या टाकीजवळ भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी एक डिसेंबरला खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून मजूर नागेश जमादार व त्याला वाचविताना अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आकुर्डी रेल्वेस्थानक परिसरात चिखलीतील दुचाकीस्वार महिला सरस्वती शिंदे यांचा बळी गेला. खोदकाम केलेल्या ठिकाणी राडारोडा रस्त्यावर पसरलेला होता. त्यावरून शिंदे यांची दुचाकी घसरली होती. याप्रकरणी महापालिका सभागृहात नगरसेवकांनी सोमवारी (ता. २०) जाब विचारल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘प्रत्येक खोदकामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना केल्या जातील,’ असे जाहीर केले होते. द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांची चौकशी समिती नियुक्त केली. तीन दिवसांत त्यांनी अहवाल द्यायचा होता. मात्र, सोमवारी सायंकाळपर्यंत (ता. २८) समितीचा अहवाल आयुक्तांकडे प्राप्त झाला नव्हता. तसेच बहुतांश खोदकामांच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना केलेल्या नसल्याचे आढळून आले.

आकुर्डी येथील अपघातप्रकरणी चौकशी पूर्ण झाली आहे. त्याबाबतचा अहवाल आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे देण्यात येणार आहे.
- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The danger of digging roads forever