

सिटीझन रिपोर्टर
...................
PNE26W41723
धोकादायक चेंबर
डी मार्टजवळील पाइपलाइन रोडला लागून ऑक्झिलियम स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरवरच मधोमध मोठ्या आकाराचे निकृष्ट दर्जाचे चेंबर तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चेंबरला अद्याप झाकणही बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे अगोदरच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेला हा रस्ता वाहतुकीसाठी अर्धाच शिल्लक राहिला आहे. या ठिकाणी अनेक अपघात झाले असून, एका जागरूक नागरिकाने चेंबरवर पत्रा टाकून तात्पुरती उपाययोजना केली आहे.
या मार्गावरून दररोज विद्यार्थी ये-जा करतात. लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी व घेण्यासाठी येणाऱ्या महिला, तसेच ज्येष्ठ नागरिकांचीही मोठी वर्दळ असते. खोल नाल्याच्या कॉर्नरवर असलेल्या या चेंबरमुळे पादचारी, तसेच दुचाकीस्वारांचा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. प्रसंगी एखाद्याच्या जिवावरही बेतू शकते.
गेल्या दोन महिन्यांपासून परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. संबंधित ठेकेदार अर्धवट आणि निकृष्ट काम करून निघून गेला आहे. या मार्गावरून संबंधित यंत्रणांचे कर्मचारी व अधिकारीही नक्कीच ये-जा करत असतील. त्यांना ही गंभीर बाब दिसत नाही का? या धोकादायक चेंबरची जबाबदारी कोणाची? एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच यंत्रणा जागी होणार आहे का? नागरिकांनाही कोणत्याही सेवा मोफत नको आहेत; मात्र कर वसुली करताना नागरिकांच्या अडचणींचा निपटारा करण्याची जबाबदारीही संबंधित यंत्रणेने गांभीर्याने पार पाडली पाहिजे. कामे नीट, पूर्ण आणि दर्जेदार होणार नसतील, तर नागरिकांनी घरपट्टी व इतर कर तरी का भरावेत?
- ॲड. कैलास दिघे, सावेडी
........................................................
मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला
शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रस्ते, गल्लीबोळ, तसेच शाळा परिसरात कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत आहेत. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांच्या वाहनांचा पाठलाग केल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून जाताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. काही भागांत कुत्र्यांनी नागरिकांचा पाठलाग केल्याच्या घटनाही घडत आहेत.
रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने त्या ठिकाणी कुत्र्यांचे कळप जमा होत आहेत. त्यामुळे परिसरात अस्वच्छतेसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण, तसेच धोकादायक ठिकाणांहून त्यांना हटविण्याची प्रभावी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- गणेश आरडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.