...अन्‌ आयुष्यातील अंधार दूर झाला

संतोष शाळिग्राम - @sshaligramsakal
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

पुणे - '‘निसर्गानं अंधत्व दिलं; पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आमच्या आयुष्यातील अंधार दूर केला. या विद्यापीठानं आम्हाला संगणक चालविण्यात तरबेज केलं. त्यामुळं आम्हाला चांगल्या पगाराची नोकरी लागली आणि आमचं जगण सुकर झालं...’’ या भावना आहेत

पुणे - '‘निसर्गानं अंधत्व दिलं; पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आमच्या आयुष्यातील अंधार दूर केला. या विद्यापीठानं आम्हाला संगणक चालविण्यात तरबेज केलं. त्यामुळं आम्हाला चांगल्या पगाराची नोकरी लागली आणि आमचं जगण सुकर झालं...’’ या भावना आहेत

विद्यापीठातील अंध विद्यार्थी अध्ययन केंद्रात शिक्षण घेऊन विविध बॅंका, रेल्वे खात्यात अधिकारी, लिपिकपदावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या. 
विद्यापीठातील प्रशिक्षणामुळे सुमारे ३३ जणांना नोकरी लागली. इच्छाशक्ती असेल, तर निसर्गानं लादलेल्या अंधत्वावरही मात करता येते, हेच या सर्वांनी दाखवून दिले आहे. शिक्षणशास्र विभागात हे अध्ययन केंद्र आहे. येथे त्यांना संगणक चालविण्याचे कौशल्य देऊन नोकरी करण्याची क्षमता मिळवून दिली जाते. 

विभागप्रमुख डॉ. संजीव सोनावणे म्हणाले, ‘‘अंध विद्यार्थी अध्ययन केंद्र २००८ मध्ये सुरू झालं. त्याचे अभ्यासक्रम आणि त्यासाठी संगणकप्रणाली विकसित करण्यापासून सर्वच गोष्टी कराव्या लागल्या. पदवी, पदव्युत्तर पदवी असलेले विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. त्यांना एखादा धडा शिकविल्यानंतर संगणकावरच परीक्षा घेतली जाते. त्यांनी शिक्षणात किती प्रगती केली, याची माहिती संगणकच देतो.’’

‘‘इंटरनेटचा वापर, ई-मेल करणे, पत्र तयार करणे, स्क्रीन वाचायचा कसा, हे शिकविले जाते. हा अभ्यास आवाजात त्यांना ऐकविला जातो. त्यांच्यासाठी व्यक्तिमत्वविकासाचे कार्यक्रम आयोजित करतो. यातून त्यांच्यामध्ये नोकरी करण्याची क्षमता आणि आत्मविश्‍वास निर्माण होतो. आतापर्यंत सुमारे चार वर्षांत ३९ विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीयीकृत बॅंका, रेल्वे, विद्यापीठे यांत सहायक प्राध्यापक, अधिकारी, संगणक निदेशक, लिपिक या पदांवर नोकरी मिळाली आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

अंधत्व असले, तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्ययन केंद्रामुळे संगणकाचे प्रगत ज्ञान मिळाले. त्यामुळे आंध्रा बॅंकेत नोकरी लागली. आता २२ हजार रुपये पगार मिळतो आहे. याचे श्रेय विद्यापीठाला जाते.
- प्रवीण पालके, लिपिक, आंध्रा बॅंक

विद्यापीठात घेतलेल्या संगणक शिक्षणामुळेच नोकरी मिळाली. त्यामुळे आयुष्य मार्गी लागले. सध्या मी सेंट्रल बॅंकेत अधिकारी आहे. साधारणपणे ४८ हजार रुपये वेतन मिळते. अंध अध्ययन केंद्रातूनच बॅंकेतील नोकरीसाठी अर्ज केला होता.
- माधुरी गोरे, अधिकारी, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, कॅम्प, पुणे
 

निसर्गाने दृष्टी नाकारली असली, तरी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न केले. त्यांना संगणकाचे प्रगत ज्ञान मिळावे म्हणून पायाभूत सुविधा उभारल्या. यातून त्यांना नोकरी तर लागलीच; त्यांचे आयुष्य घडले, याचे समाधान वाटते.
- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू

Web Title: the darkness of life