दसऱ्याला तेजीची आशा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

‘दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा...’ असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमी अर्थात दसरा सण. या सणासाठी शहरातील बाजारपेठा भगव्या व पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजल्या आहेत. सोने खरेदीचा मुहूर्त साधतानाच नवीन वाहन, गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली.

पिंपरी - ‘दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा...’ असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमी अर्थात दसरा सण. या सणासाठी शहरातील बाजारपेठा भगव्या व पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजल्या आहेत. सोने खरेदीचा मुहूर्त साधतानाच नवीन वाहन, गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली.

इलेक्‍ट्रॉनिक दुकानांमध्ये विविध सवलतीच्या योजना सुरू असल्याने त्याकडे ग्राहक आकर्षित झाले होते. टीव्ही, फ्रिज अशा गृहोपयोगी वस्तूंसाठी महिलांनी गर्दी केली होती. वाहन खरेदीसाठीही ग्राहकांची लगबग सुरू होती. बऱ्याच जणांनी दुचाकीचे आधीच बुकिंग केले होते. मंदीमुळे गाड्यांच्या किमती कमी झाल्याने काहीजणांनी खरेदीचा योग साधला. 

चिंचवड येथील शाहूनगर दसरा चौकात आज कोल्हापुरी शाही दसरा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. कोल्हापूर मित्र 
मंडळाने यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. जवळपास दीड ते दोन हजार बांधव यात सहभागी होणार आहेत. श्री महालक्ष्मी मंदिरातून पालखीची मिरवणूक निघून डॉ. डी. वाय पाटील मैदानात तलवारीला स्पर्श करून सीमोल्लंघन केले जाणार आहे. 

सराफ कट्ट्यावर महिलांनी मुहुर्ताची सोनेखरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. आकर्षक दागिन्यांची लयलूट केली. बऱ्याच ठिकाणी कंगन, पाटल्या आणि बांगड्या अशा सेटची ऑफर असल्याने महिलांचा कल अशा वस्तू खरेदी करण्याकडे होता. 

दसऱ्याच्या मुहुर्तावर दुचाकी व चारचाकी वाहने धुण्यासाठी नागरिकांनी वॉशिंग सेंटरना गर्दी केली होती. वाहने वेटिंगवर होती. सायंकाळच्या वेळी ही गर्दी जास्त वाढली. 

रावणदहन करून विजयोत्सव साजरा करण्यासाठी भोसरी, पिंपरी, आकुर्डी खंडोबा माळ, वाल्हेकरवाडी यासह शहरात ठिकठिकाणी रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पथसंचलनाची जय्यत तयारी सुरू आहे. हजारोंच्यावर स्वयंसेवक यात सहभागी होणार आहेत. एकूण २१ ठिकाणी हे संचलन होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dasara Vijayadashami Purchasing