झेंडूला झळाळी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

फुलांनी खाल्ला भाव
मार्केट यार्डतील फूलबाजारात झेंडूच्या फुलांची ३४३ टन आवक झाली. घाऊक बाजारात झेंडूच्या फुलांना दर्जानुसार २० ते ४० रुपये, तर किरकोळ बाजारात दर्जानुसार ४० ते ८० रुपये किलो भावाने विक्री होत आहे. पूजेसाठी मानाचे पान असलेल्या या फुलांना मागणीही मोठी आहे.

पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठांत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. हारासाठी झेंडू, शेवंती, गुलाब, निशिगंधासह अनेक फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. यंदाही फुलांच्या किमती तेजीत होत्या.

दसऱ्याच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोने, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, वाहने आणि घर खरेदीवर विविध प्रकारचे डिस्काउंट देण्यात आले आहेत. मार्केट यार्डात झेंडू, शेवंती, गुलाब, निशिगंधासह अनेक फुलांना मागणी आहे. मंडई आणि परिसरात आंब्यांचा डगळा १५ ते २० रुपयांना विकण्यात आला. रविवारी बाजारात जुईच्या एका किलोस एक हजार ९०० तर चमेलीच्या एका किलोस एक हजार रुपये भाव होता. किरकोळ बाजारात हे भाव २० ते २५  टक्‍क्‍यांनी वाढले होते. 

सोन्याचा भाव चाळीस हजार रुपयांच्या घरात पोचला असला तरी दागिने विकत घेण्यासाठी पुणेकरांनी बुकिंग केले आहे. सोन्यासाठी दुकानांमध्येही आकर्षक बक्षीस योजना ठेवल्याने ग्राहक आकर्षित झाला आहे.

रावणदहनाची तयारी पूर्ण 
वाईट प्रवृत्तीचा नायनाट व्हावा म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावणदहनाची परंपरा आहे. यासाठीची सर्व तयारीही मंडळांनी पूर्ण केली आहे. दहनावेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये, याचीदेखील मंडळांनी काळजी घेतली आहे.

सोने आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीस नागरिकांची पसंती दिसत आहे. फुलांचा भाव वाढला असला तरी खरेदीसाठी गर्दी आहे. मी फुले खरेदी केली आहेत.  
- अरुण काळे, ग्राहक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dasara Zendu Rate Increase