Daund: कोणार्क एक्सप्रेस मधील प्रवाशांना लूटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

दौंड : कोणार्क एक्सप्रेस मधील प्रवाशांना लूटले

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड : मुंबई - भूवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस मधील दोन महिलांच्या गळ्यातील दीड लाख रूपयांचे दागिने लूटण्यासह चोरट्यांनी एका प्रवाशाला गंभीररित्या जखमी केले आहे. दौंड तालुक्यातील नानवीज रेल्वे फाटक जवळ रेल्वे सिग्नलच्या तारा तोडून एक्सप्रेस थांबविण्यात आली होती.

दादर सेंट्रल येथून मुंबई - भूवनेश्वर (कोविड स्पेशल) कोणार्क एक्सप्रेस २६ ऑक्टोबर रोजी १ तास ३१ मिनिटांच्या विलंबाने धावत होती. पुणे - दौंड लोहमार्गावर पाटस व दौंड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नानवीज रेल्वे फाटक जवळील आउटर सिग्नलच्या तारा तोडल्याने रात्री साडेआठ वाजता कोणार्क एक्सप्रेस थांबली होती. चोरट्यांनी एस १ या डब्ब्याच्या खिडकीतील मिनाक्षी शिवपुत्र गायकवाड (वय २५, रा. रामवाडी, सोलापूर) यांच्या गळ्यातील पासष्ट हजार रूपयांची एक सोनसाखळी ओढून घेतली.

हेही वाचा: जालना : आष्टीत कापसाला आठ हजारांचा भाव

हा प्रकार पाहून मिनाक्षी गायकवाड यांचे बंधून राकेश गायकवाड हे डब्ब्यातून खाली उतरले व त्यांनी दोन चोरट्यांना पकडले. परंतु अन्य चोरट्यांनी दगडांचा जोरदार मारा केल्याने चोरटे निसटले. राकेश यांच्या पायाला जखम झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.

तसेच एस - ४ या डब्ब्यातील खिडकीत बसलेल्या कल्पना विनायक श्रीराम ( वय ५९, रा. वालचंद कॅालेज जवळ, सोलापूर) यांच्या गळ्यातील ९० हजार रूपयांचे गंठण चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. चोरट्यांनी इंजिनवर देखील दगडफेक केली.

सदर प्रकाराची माहिती मिळताच लोहमार्गचे सहायक निरीक्षक युवराज कलकुटगे घटनास्थळी रवाना झाले. रात्री ९ वाजून २८ मिनिटांनी एक्सप्रेस दौंड रेल्वे स्थानकात दाखल झाली. जखमींवर प्रथमोपचार केल्यानंतर ९ वाजून ५६ मिनिटांनी एक्सप्रेस सोलापूर साठी रवाना झाली. दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात मिनाक्षी गायकवाड व सहप्रवाशांच्या फिर्यादीनुसार ३ ते ४ अज्ञात चोरट्यांविरूध्द जबरी चोरी व रेल्वे सिग्नलच्या तारा तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार ताराचंद सुडगे पुढील तपास करीत आहेत.

दौंड लोहमार्ग पोलिस दल व दौंड पोलिसांच्या वतीने घटनास्थळ आणि परिसरात चोरट्यांच्या शोधासाठी मोहिम राबविण्यात आली.

loading image
go to top