
दौंड - ईद निमित्त राष्ट्र विकासाकरिता प्रार्थना
दौंड : दौंड शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त राष्ट्र विकासाकरिता सामुहिक प्रार्थना करण्यात आली. शहरात रमजान ईद निमित्त सकाळी भीमा नदीकाठी असलेल्या ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी पारंपरिक वेशात अबालवृध्द मोठया संख्येने उपस्थित होते. सामुहिक नमाज पठणानंतर मौलाना मोहमद शमशाद कादरी यांनी धर्मसंदेश देण्यासह राष्ट्राच्या समृध्दी, सुरक्षा आणि सुयशाकरिता विशेष सामुहिक प्रार्थना केली. राष्ट्रात सौहार्दपूर्ण वातावरण कायम राहणे आणि परस्परांमध्ये निकोप प्रेम वाढण्यासह अपप्रवृत्तींपासून लांब ठेवण्याकरिता याचना करण्यात आली. त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगार, आजारी नागरिकांना चांगले स्वास्थ्य आणि अडचणीत असलेल्या नागरिकांची समस्येतून सुटका व्हावी याकरिता प्रार्थना करण्यात आली. नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी दफनभूमीत जाऊन आप्त व स्वजनांच्या थडग्यांवर फुले वाहून आदरांजली वाहिली.
परस्परांना आलिंगन देत ` ईद - मुबारक ` म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या. राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, पोलिस उप अधीक्षक राहुल धस, निरीक्षक विनोद घुगे, आदी या वेळी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
Web Title: Daund Ramzan Eid Fitar Development
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..