Leopard : बिबट्यांच्या हल्ल्यांतील मृतांचा आकडा

बिबट्यांच्या वाढत्या मानवी हल्ल्यांमुळे आता बिबट-मानव संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे. जुन्नर वनविभागात (जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुका) सन २००१ ते आतापर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यांत १४४ नागरिक जखमी झाले आहेत, तर ४५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Leopard
Leopardsakal

खोडद : बिबट्यांच्या वाढत्या मानवी हल्ल्यांमुळे आता बिबट-मानव संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे. जुन्नर वनविभागात (जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुका) सन २००१ ते आतापर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यांत १४४ नागरिक जखमी झाले आहेत, तर ४५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यात सन २०२० ते आतापर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यात १६ नागरिक जखमी झाले आहेत, तर ६ जण मृत्युमुखी पडले आहेत.

प्रश्‍न संवेदनशील

जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. तालुक्यात बिबट्यांचा उपद्रव व बिबट्यांचे हल्ले कमी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न किंवा तरतूद केंद्र सरकारने केलेली नाही. जुन्नरमध्ये अलीकडच्या काही दिवसांत बिबट्यांच्या हल्ल्यात लहान मुलांचा व नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे बिबट्यांचा प्रश्न अधिक संवेदनशील झाला आहे. नागरिक व शेतकऱ्यांमधून वनविभागाविषयी संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

वन विभागावर रोष

बिबट्यांच्या सुरक्षेसाठी वन्यजीव संरक्षण कायदा केंद्र सरकारचा, बिबट्यांच्या हल्ल्यात जीव जातोय नागरिकांचा आणि रोषाला सामोरे जावे लागतंय वनविभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना, अशी परिस्थिती सध्या जुन्नर तालुक्यात निर्माण झाली आहे. बिबट्याकडून झालेल्या मानवी हल्ल्यानंतर अनेकदा नागरिकांचा प्रक्षोभ झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे बिबट्यांच्या हल्ल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. वनविभागाचे कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना मारहाणीसारखे प्रकारदेखील घडत आहेत.

Leopard
Leopard Attack : पिंपरी पेंढार येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

केंद्राची क्षमता वाढणार

माणिकडोह बिबट निवारा केंद्राची क्षमता वाढवण्याची मागणी सन २०१७ पासून वनविभागाकडून केली जात होती. त्याचा विचार करून राज्य सरकारने १२ हेक्टर नवीन जागा बिबट निवारा केंद्रासाठी दिली आहे. त्यामुळे केंद्राची क्षमता दुप्पट होणार आहे. या निवारा केंद्रातील बिबटे ठेवण्याची क्षमता ४०वरून १०० होणार आहे. त्यामुळे बिबट्यांचा उपद्रव कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

परवानगी नागपूरकडे

उपद्रवी बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यासाठी किंवा बेशुद्ध करून पकडण्यासाठी राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक (नागपूर) यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्येकवेळी नागपूर कार्यालयाची परवानगी घेणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी वनविभागाकडून तत्काळ पिंजरे लावले जात आहेत.

  • बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना २५ लाख रुपये तर गंभीर जखमी

  • झालेल्या व्यक्तीला ५ लाख रुपयांची तातडीची मदत जुन्नर वनविभागाकडून दिली जाते.

काय आहे वन्यजीव संरक्षण कायदा?

सन १९७२च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत बिबट्याचा अनुसूची क्र.१ मध्ये समावेश केला आहे. या कायद्यांतर्गत बिबट्याला अधिक संरक्षण दिले आहे. ससे, रानडुक्कर यांसारख्या अन्य वन्यजीवांची संख्या नियंत्रित राहण्यासाठी बिबट्याचे अस्तित्व कायद्यात महत्त्वाचे मानले गेले आहे.

जुन्नर तालुक्यात मागील २५ वर्षांपासून बिबट्यांचे वास्तव्य आहे. ऊस शेतीमुळे बिबट्यांना मिळालेल्या सुरक्षेमुळे त्यांची संख्या वाढत आहे. एकच ठिकाणी अनेक बिबटे असलेले ‘हॉट स्पॉट’ वाढले आहेत. त्यामुळे बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. वनविभागाला काम करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते. त्यासाठी विशेष दलाची गरज आहे.

-अमोल सातपुते,

उपवनसंरक्षक, जुन्नर

वन विभागाचे आवाहन

  • नागरिकांनी शेतात काम करताना एकट्याने न जाता समुहाने जावे.

  • काम करत असताना आवाज करावा, तसेच सावधानता बाळगावी.

  • बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रामध्ये दक्षता घ्यावी.

  • अधूनमधून फटाके फोडून आवाज करावा.

  • शेतशिवारात असलेल्या घरांच्या अनुषंगाने लहान मुलांना/वृद्धांना घराच्याबाहेर एकटे सोडू नये.

  • घराबाहेर उघड्यावर झोपू नये.

काय उपाययोजना करता येतील?

तातडीची उपाययोजना

जुन्नर तालुका मानव- बिबट संघर्षाचे आपत्ती क्षेत्र घोषित करणे, बिबट्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ व साधन सामग्री उपलब्ध करणे, विशेष सुरक्षा बल स्थापन करणे.

दीर्घकालीन उपाययोजना

बिबट संख्या नियंत्रणासाठी नसबंदी करणे, इतर शास्त्रीय उपाय राबविणे, वन्यजीव संरक्षण कायद्यात दुरुस्तीसाठी संसदेत आवाज उठवावा, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com