डेक्कन कॉलेजला ‘राष्ट्रीय दर्जा’ मिळवून देऊ

डेक्कन कॉलेजला ‘राष्ट्रीय दर्जा’ मिळवून देऊ
Published on

पुणे, ता. १७ : ‘‘डेक्कन कॉलेजला मानवशास्त्र, भारतीय संस्कृती आणि सभ्यता अभ्यासाचे देशातील प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल. तसेच संस्थेला ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ (आयएनआय) दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल,’’ असे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. संस्थेला ‘आयएनआय’चा दर्जा मिळवून देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. निधीची मागणी आणि उद्दिष्टे टप्प्याटप्प्याने निश्‍चित करून प्रस्ताव सादर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेचा (अभिमत विद्यापीठ) ८७ वा पुनरुज्जीवन दिन सोमवारी साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन, प्रभारी कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘संस्थेच्या विकासासाठी एबीएचए महाराष्ट्र, अध्यापक विकास कार्यक्रम आणि व्हिजन २०४७ या तीन प्रमुख उपक्रमांना राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी सुलभ होण्यासाठी प्राध्यापकांची गरज, निधी आणि अन्य उद्दिष्टांसाठी निश्‍चित कालमर्यादा ठरवून टप्प्याटप्प्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा.’’
डेक्कन कॉलेजला भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेच्या (आयसर) धर्तीवर ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ दर्जा मिळवून देण्याचे उद्दिष्ट डॉ. पटवर्धन यांनी मांडले. यासाठी प्रा. अंबा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पीअर-रिव्ह्यू समिती, डॉ. दर्शन शंकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिजन कमिटी आणि डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. विजय केळकर, डॉ. शां. ब. मुजुमदार आणि प्रा. कपिल कपूर यांचा मेंटॉर ग्रुप कार्यरत आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल ऑक्टोबरअखेर केंद्र सरकार, नीती आयोग आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाला सादर केला जाणार आहे. संस्थेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.

संस्थेतील तीन प्रमुख उपक्रम
१. एबीएचए महाराष्ट्र : ‘अलायन्स ऑफ भारतीय ॲकॅडेमिया फॉर ट्रान्सडिसिप्लिनरी एज्युकेशन’च्या माध्यमातून राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये परस्पर सहकार्य वाढवून आंतरशाखीय शिक्षणाला चालना दिली जाणार आहे.
२. अध्यापक विकास कार्यक्रम : महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकादमीच्या सहकार्याने प्राध्यापकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे अध्यापकांची क्षमता, कौशल्ये आणि अध्यापनाची गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
३. व्हिजन २०४७ : डेक्कन कॉलेजची गौरवशाली शैक्षणिक परंपरा आणि वारसा जपत बदलत्या काळानुसार संस्थेची भूमिका अधिक व्यापक करण्याचा दीर्घकालीन आराखडा राबविला जाणार आहे. या उपक्रमाला राज्य सरकारने पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com